

रविवारी (दि.२५) प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना लोकल प्रवासात अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने विविध तांत्रिक कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घोषित केला असून या काळात अनेक लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत, तर काही गाड्या विलंबाने धावणार आहेत.
मध्य रेल्वेवर ब्लॉक
मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील लोकल गाड्या धीम्या मार्गावरून वळवण्यात येणार असल्याने काही फेऱ्या रद्द होणार आहेत.
हार्बर रेल्वेवरील परिणाम
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० या वेळेत हार्बर मार्गावर ब्लॉक असणार आहे. या कालावधीत सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल तसेच सीएसएमटी ते वांद्रे, गोरेगाव मार्गावरील अनेक लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉकवेळेत पनवेल ते कुर्ला (फलाट क्रमांक ८) दरम्यान दर २० मिनिटांनी विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेवरही ब्लॉक
पश्चिम रेल्वेच्या अंधेरी ते गोरेगाव दरम्यान सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ब्लॉक घेतला जाणार आहे. तसेच पश्चिम रेल्वे हार्बर मार्गावर माहीम ते अंधेरी दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत अप आणि डाउन मार्गावर ब्लॉक राहणार आहे. या काळात चर्चगेट-गोरेगाव, सीएसएमटी-वांद्रे मार्गावरील अनेक लोकल फेऱ्या रद्द राहतील.
प्रवाशांना आवाहन
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी लोकल वेळापत्रक तपासण्याचे आणि पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.