Mumbai : ऑफिसला पोहोचलात, पण आता घरी कसं जाणार? मध्य रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने; लोकलच्या खोळंब्याने प्रवासी हैराण

मध्य रेल्वेची लोकल उशिराने धावणे, अचानक कुठेतरी थांबणे आणि त्यामुळे प्रवाशांची होणारी धावपळ, हे मुंबईकरांसाठी नवीन नाही. मात्र...
Mumbai : ऑफिसला पोहोचलात, पण आता घरी कसं जाणार? मध्य रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने; लोकलच्या खोळंब्याने प्रवासी हैराण
Mumbai : ऑफिसला पोहोचलात, पण आता घरी कसं जाणार? मध्य रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने; लोकलच्या खोळंब्याने प्रवासी हैराण (Photo-X)
Published on: 

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी (दि. २६) सकाळी लोकल वाहतुकीचा खोळंबा झाला. यामुळे ऑफिसला जाणाऱ्या नोकरदारांसह विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. कांजूरमार्ग स्थानकातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल गाड्या उशिराने धावू लागल्या. दरम्यान, मुलुंड-ठाणेदरम्यान धीम्या मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये कापड अडकल्यानेही वाहतुकीवर परिणाम झाला. त्यानंतर, रेल्वे प्रशासनाने डाऊन वाहतूक धिम्या गतीने सुरु झाल्याची माहिती दिली असली, तरी सकाळच्या खोळंब्यानंतर संध्याकाळी घरी वेळेत पोहोचता येईल का, अशी चिंता प्रवाशांना सतावत आहे.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकलचा खोळंबा

मध्य रेल्वेची लोकल उशिराने धावणे, अचानक कुठेतरी थांबणे आणि त्यामुळे प्रवाशांची होणारी धावपळ, हे मुंबईकरांसाठी नवीन नाही. मात्र, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकलचा खोळंबा झाल्याने नोकरदार, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. ऑफिसला उशीर होणार, लेटमार्क लागणार, बॉसला काय सांगायचे, अशा एक ना अनेक चिंता प्रवाशांना सतावत होत्या.

वेळेवर घरातून निघूनही रेल्वेच्या तांत्रिक बिघाडामुळे कामाच्या ठिकाणी उशिरा पोहोचण्याची वेळ येते. बिघाड प्रवाशांच्या हातात नसला, तरी त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होण्याची भीती नोकरदारांना सतावत होती.

डाऊन वाहतूक पूर्ववत; पण संध्याकाळी घरी कसं पोहोचणार?

सकाळच्या लोकल खोळंब्यामुळे प्रवाशांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले. अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी धावपळ करावी लागली. आता संध्याकाळी कार्यालयातून घरी परतताना लोकल वेळेवर मिळणार का, हा प्रश्न प्रवाशांना सतावत आहे. वाहतूक धिम्या गतीने सुरु झाली असली, तरी बिघाडामुळे विस्कळीत झालेले वेळापत्रक सुरळीत होण्यासाठी किती वेळ लागेल, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

ना उद्घोषणा, ना इंडिकेटरवर नीट माहिती; प्रवाशांची गैरसोय

सोमवारी सकाळी सुमारे ९ वाजून ३३ मिनिटांनी कांजूरमार्ग स्थानकातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे स्थानकावरील सिग्नल बंद पडले. विक्रोळी ते भांडुपदरम्यानही सिग्नल यंत्रणेवर परिणाम झाला. परिणामी, लोकल गाड्या सावधगिरीने चालवण्यात आल्या. एकामागोमाग एक लोकल अडकू लागल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आणि गाड्या उशिराने धावू लागल्या.

या सगळ्यात लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची अडचण आणखी वाढली ती माहितीअभावी. गाडी किती वेळ थांबणार, नेमके काय झाले आहे आणि लोकल कधी सुरू होणार, याची स्पष्ट माहिती मिळत नसल्याची प्रवाशांची तक्रार होती. इंडिकेटरवरही गाड्यांच्या वेळेबाबत योग्य अपडेट मिळत नसल्याने पुढे काय करायचे, हे समजत नव्हते.

लोकलच्या खोळंब्याचा विद्यार्थ्यांनाही फटका; सोमय्या कॉलेजची परीक्षा पुढे ढकलली

लोकल सेवेतील व्यत्ययाचा फटका विद्यार्थ्यांनाही बसला. मुंबईतील विद्याविहार परिसरातील सोमय्या कॉलेजमध्ये सोमवारी होणारी रसायनशास्त्र विषयाची मिड-सेमिस्टर परीक्षा पुढे ढकलण्यात आली. फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, कॉलेजमधील दोन विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली. संस्थेकडून पाठवण्यात आलेल्या मेसेजनुसार, ही परीक्षा आता २८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

मुलुंड-ठाणेदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये कापड अडकलं

दरम्यान, मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये कापड अडकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आणि लोकल वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सकाळी १० वाजल्यापासून संबंधित ओव्हरहेड वायरचा वीजपुरवठा बंद करून ब्लॉक घेतला. त्यानंतर तांत्रिक पथकाने दुरुस्तीचे काम हाती घेतले. या कामामुळेही लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम झाला.

Mumbai : ऑफिसला पोहोचलात, पण आता घरी कसं जाणार? मध्य रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने; लोकलच्या खोळंब्याने प्रवासी हैराण
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा; ठाणे-मुलुंडदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तार अडकली; प्रवासी संतप्त, रुळांवरून पायपीट

नेमकं काय घडलं? रेल्वे प्रशासनाने दिली माहिती

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ वाजून ३३ मिनिटांच्या सुमारास कांजूरमार्ग स्थानकातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे स्थानकावरील सिग्नल बंद पडले. विक्रोळी ते भांडुपदरम्यानही सिग्नल यंत्रणेवर परिणाम झाल्याने गाड्यांचे परिचालन नियंत्रित करण्यासाठी पर्यायी व्यवस्था लागू करण्यात आली.

कांजूरमार्ग स्थानकावर तसेच विक्रोळी-भांडुपदरम्यान गाड्या 'ए-बोर्ड'च्या आधारे चालवण्यात आल्या. याशिवाय, विक्रोळी ते भांडुपदरम्यान 'ॲब्सोल्युट ब्लॉक' पद्धत लागू करण्यात आली. गाड्यांना 'टीडी ९१२' प्राधिकरणानुसार पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली.

या व्यवस्थेनुसार, विक्रोळी येथून डाऊन लोकल मार्गावर पहिली गाडी K39, तर डाऊन थ्रू मार्गावर BL11 चालवण्यात आली. सिग्नल यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी तांत्रिक पथक प्रयत्न करत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिलांचे हाल

लोकलमध्ये बराच वेळ अडकून पडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. लहान मुलांना घेऊन प्रवास करणारे पालक, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या खोळंब्याचा मोठा त्रास सहन करावा लागला. कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लेक्चर आणि परीक्षा चुकण्याची चिंता सतावत होती. काही ठिकाणी लोकल बराच वेळ जागेवरच उभी राहिल्याने काही प्रवाशांनी थेट रेल्वे रुळांवरून पायी चालत जाण्याचा धोकादायक मार्ग स्वीकारला.

प्रवाशांना वेळेवर माहिती मिळणं महत्त्वाचं

"मुंबईकरांसाठी लोकल म्हणजे रोजच्या जगण्याचा आधार. तांत्रिक बिघाड होणे ही एक बाब असली, तरी अशा वेळी प्रवाशांना वेळेवर आणि स्पष्ट माहिती मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. लोकल किती वेळ थांबणार, पुढची गाडी कधी येणार आणि वाहतूक कधी पूर्ववत होणार, याची माहिती इंडिकेटरवर आणि घोषणांमधून मिळाली, तर प्रवाशांना पुढचा निर्णय घेणे सोपे होईल." असे मत एका महिला प्रवाशाने व्यक्त केले.

सकाळच्या खोळंब्यामुळे ऑफिसला जाणारे नोकरदार, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. मध्य रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली असली, तरी संध्याकाळचा प्रवास सुरळीत होणार का, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in