

मुंबईकरांच्या धावपळीच्या आयुष्यात लोकल ट्रेनला विशेष महत्त्व आहे. रोजचा प्रवास, त्यात भेटणारी माणसं, गप्पा आणि त्यातून जुळणारी मैत्री... हे सगळं अनेकांच्या रोजच्या जगण्याचा भाग बनलं आहे. लोकलमधून रोज एकत्र प्रवास करणारे प्रवासी अनेकदा एकमेकांच्या सुख-दुःखातही सहभागी होतात. अशाच मैत्रीचं एक सुंदर उदाहरण सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. लग्नाआधी केल्या जाणाऱ्या पारंपरिक केळवणाचा कार्यक्रम घरी किंवा हॉटेलमध्ये करण्याऐवजी काही मैत्रिणींनी चक्क मुंबईच्या लोकलमध्येच आयोजित केला. या खास केळवणासाठी त्यांनी लोकलचा संपूर्ण डबाच सजवला. या अनोख्या केळवणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
लोकलच्या डब्यातच सजवला केळवणाचा थाट
५६ सेकंदाच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये लोकलमधील एका लेडीज डब्याची सुंदर सजावट केलेली पाहायला मिळते. पाने, फुले, हार आणि आकर्षक तोरण लावून डबा सजवण्यात आला आहे. एवढंच नाही, तर 'स्नेहलचं केळवण' असं नाव असलेला खास फलकही लावण्यात आला आहे. त्यामुळे लोकलच्या डब्याला एखाद्या घरगुती समारंभाचं स्वरूप आल्याचं दिसतं.
मैत्रिणींनी केलं स्नेहलचं औक्षण
या खास सोहळ्यासाठी स्नेहल डब्यात येताच तिच्या मैत्रिणींनी एकत्र येऊन तिचं औक्षण केलं. पारंपरिक पद्धतीने तिचं स्वागत करत तिला साडी आणि इतर भेटवस्तूही दिल्या. यावेळी सगळ्यांनी मिळून फोटोसेशन करत आनंदाचे क्षणही कॅमेऱ्यात टिपले. नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या स्नेहलला मैत्रिणींनी अशा अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या.
सोशल मीडियावर व्हिडिओची चर्चा
हा व्हिडिओ मुंबईतील नेमक्या कोणत्या लोकल ट्रेनमधील आहे, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, लोकलच्या डब्यात साजरा झालेल्या या अनोख्या केळवणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. सध्या लग्नसराईच्या काळात केळवणाचे विविध कार्यक्रम पाहायला मिळतात. मात्र, लोकल ट्रेनमध्येच अशा पद्धतीने केळवण साजरे करण्याची कल्पना अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, काही जण मैत्रिणींच्या या अनोख्या कल्पनेचे कौतुक करत आहेत, तर काही जण लोकलमधील अशा आयोजनाबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत.