Mumbai : लोकल प्रवाशांसाठी सूचना; उद्या 'या' रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, वाचा वेळापत्रक

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासून पर्यायी व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे.
Mumbai : लोकल प्रवाशांसाठी सूचना; उद्या 'या' रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, वाचा वेळापत्रक
Published on

मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर या आठवड्याच्या शेवटी देखभाल व तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यामुळे काही लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार आहे.

पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक

पश्चिम रेल्वेकडून रविवार, १५ मार्च २०२६ च्या मध्यरात्री बोरीवली ते भाईंदर दरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक रात्री १२:१५ ते पहाटे ३:४५ या वेळेत राहणार आहे.

या कालावधीत विरार/वसई रोड ते बोरीवली दरम्यान सर्व फास्ट लोकल गाड्या स्लो मार्गावरून चालवल्या जाणार आहेत.

प्रभादेवी स्थानकात मोठा ब्लॉक

याशिवाय, प्रभादेवी स्थानकावर रात्री १:३० ते सकाळी ६:०० या वेळेत मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. येथे प्रभादेवी रोड ओव्हरब्रिजचा गर्डर हटवण्याचे काम (De-Launching) करण्यात येणार आहे.

या कामामुळे काही उपनगरीय गाड्या रद्द होऊ शकतात तर काही आंशिक मार्गावर थांबवण्यात किंवा दादर किंवा वांद्रे येथून परत वळवण्यात येऊ शकतात. या कालावधीत चर्चगेट ते प्रभादेवी दरम्यान लोकल सेवा बंद राहणार आहे. तसेच माटुंगा रोड आणि माहिम स्थानकांवरही गाड्या उपलब्ध राहणार नाहीत.

ब्लॉकमुळे सूरत ते विरार दरम्यान काही मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेने सांगितले. पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले की, १५ मार्चला दिवसभरात उपनगरीय मार्गावर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.

मध्य रेल्वेवर ट्रान्सहार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

दरम्यान, मध्य रेल्वेकडून ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

रेल्वे ट्रॅक आणि सिग्नलच्या देखभालीसाठी हा ब्लॉक रविवार, सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० या वेळेत राहणार आहे. या काळात ठाणे ते वाशी/नेरुळ आणि ठाणे ते पनवेल दरम्यानच्या सर्व अप व डाऊन लोकल सेवा रद्द राहणार आहेत.

याशिवाय, ठाणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ आणि ४ च्या विस्तारासाठी तसेच डोंबिवली स्थानकावरील प्लॅटफॉर्म १अ, १ आणि २ च्या विस्तारासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवार रात्री १२ वाजल्यापासून ते रविवार सकाळी १० वाजेपर्यंत मुलुंड ते ठाणे आणि दिवा ते डोंबिवलीदरम्यान १० तासांचा ब्लॉक असणार आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासून पर्यायी व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in