

मुंबई उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती आहे. रविवार, ८ मार्च रोजी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गांवर देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा आणि जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार असून काही गाड्या सुमारे २० मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो.
पश्चिम रेल्वेवर जम्बो ब्लॉक
पश्चिम रेल्वेवर माहीम ते सांताक्रूझ दरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गांवर रविवारी रात्री १.०० ते ४.३० या वेळेत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत स्लो मार्गावरील लोकल गाड्या फास्ट मार्गावर वळवण्यात येतील.
काही स्थानकांवरील प्लॅटफॉर्म लहान असल्यामुळे महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड या स्थानकांवर काही उपनगरीय गाड्या थांबणार नाहीत. त्याऐवजी लोअर परळ, माहीम आणि खार रोड स्थानकांवर दुहेरी थांबा देण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवर मेन लाईनवर ब्लॉक
माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गांवर रविवार ११:२० ते ३:४५ या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत फास्ट लोकल गाड्या स्लो मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे काही गाड्या रद्द होण्याची शक्यता असून काही गाड्या सुमारे २० मिनिटांच्या विलंबाने धावू शकतात.
कल्याण-डोंबिवलीदरम्यान ब्लॉक
याशिवाय ७ आणि ८ मार्चच्या मध्यरात्री कल्याण ते डोंबिवली दरम्यान १:४५ ते ४:१५ या वेळेत देखभाल ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे फास्ट आणि स्लो दोन्ही मार्गांवरील सेवा प्रभावित होणार आहेत.
सीएसएमटीहून रात्री १२:०८ वाजता सुटणारी कल्याण लोकल ही ठाणेपर्यंतच धावेल. तसेच कल्याणहून रात्री २:३० वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल ही ठाणेहून पहाटे ४:०० वाजता सीएसएमटीकडे रवाना होईल.
हार्बर लाईनवरही मेगा ब्लॉक
दरम्यान, हार्बर लाईनवर कुर्ला ते वाशी दरम्यान रविवार ११:१० ते ४:१० या वेळेत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटी-वाशी, बेलापूर आणि पनवेल दरम्यान धावणाऱ्या सर्व अप आणि डाऊन लोकल गाड्या या कालावधीत रद्द राहतील.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येणार आहेत.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ठाणे-वाशी/नेरुळ मार्गावरील सेवा तसेच उरण मार्गावरील गाड्या नियमित वेळापत्रकानुसार सुरू राहतील.
प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी प्रवासाचे नियोजन आधीच करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.