

मुंबई : वाढत्या उन्हामुळे बहुतांश घरात एसीचा वापर वाढला आहे. एसीचा सतत वापर होत असल्याने अंधेरी जुहू येथील ११ मजली इमारतीच्या सहाव्या मजल्यावर अग्निभडका उडाला. गुरुवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास जुहूतील जेव्हीपीडी येथील मनीषा इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. काही वेळात आग वाऱ्यासारखी पसरली आणि वरील ७, ८ आणि ९ मजल्यावरील घरांना झळ बसली. इमारतीत धुराचे लोट पसरल्याने धुराचा त्रास होऊन ८ जण जखमी झाले
जुहू येथे जेव्हीपीडी रोड येथे मनीषा ही ११ मजली इमारत आहे. या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील थ्री बीएचके घरातील बेडरूममधून सकाळी साडेसात वाजता एसी युनिटमधून धूर निघाला आणि आग वाऱ्यासारखी पसरली
मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र आग सहाव्या मजल्यावरून हळूहळू वरच्या मजल्यापर्यंत पसरत गेली. त्यामुळे संपूर्ण इमारतीत धूर पसरला. अनेक जणांनी खबरदारी म्हणून घरातच राहणे पसंत केले. मात्र त्यांना धुराचा त्रास होऊ लागला. तर काहींनी गच्चीवर धाव घेतली. यावेळी अग्निशमन दलाने सहाव्या मजल्यावर धाव घेत आगीवर नियंत्रणासाठी प्रयत्न सुरूच ठेवले. यावेळी सहाव्या मजल्यावरील अन्य मजल्यांवरच्या घरांचे दरवाजेही आगीत सापडले. मात्र वेळीच पोहोचलेल्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रणासाठी केलेल्या अथक प्रयत्नानंतर सकाळी साडेअकरा वाजता आगीवर नियंत्रण मिळवले.
जखमींची प्रकृती स्थिर
या घटनेत गौतम झवेरी (८६), रिचा गुप्ता (४४), अल्पा (६३) अनुषा (३५), निपुल (५२), राहिल (३६), कोकिला झवेरी (९१), सरला धरू (८०) हे रहिवाशी जखमी झाले. यामध्ये दोन जणांवर उपचार करून सोडण्यात आले, तर अन्य रहिवाशांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.