Mumbai : बुरखा घालून लेडीज डब्यात शिरला पुरुष; जाब विचारताच धावत्या लोकलमधून उडी मारून पलायन, RPF कडून गुन्हा दाखल

मुंबईच्या लोकल ट्रेनमधील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सेंट्रल रेल्वेच्या लेडीज डब्यात बुरखा घालून प्रवास करणारा एक पुरुष आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गुन्हा दाखल केला आहे.
बुरखा घालून लेडीज डब्यात शिरला पुरुष; जाब विचारताच धावत्या लोकलमधून उडी मारून पलायन, RPF कडून गुन्हा दाखल
बुरखा घालून लेडीज डब्यात शिरला पुरुष; जाब विचारताच धावत्या लोकलमधून उडी मारून पलायन, RPF कडून गुन्हा दाखल
Published on

मुंबईच्या लोकल ट्रेनमधील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सेंट्रल रेल्वेच्या लेडीज डब्यात बुरखा घालून प्रवास करणारा एक पुरुष आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या प्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गुन्हा दाखल केला आहे.

लोकलमधील महिलांना संशय

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.६) दुपारी सीएसएमटीकडे जाणाऱ्या फास्ट लोकलमध्ये हा प्रकार घडला. प्रवासादरम्यान लेडीज डब्यातील काही महिला प्रवाशांना एका सहप्रवाशाबाबत संशय आला. चौकशी केली असता बुरखा परिधान केलेली व्यक्ती प्रत्यक्षात पुरुष असल्याचं उघड झालं. महिलांनी त्याला जाब विचारत संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात टिपला.

जाब विचारताच धावत्या लोकलमधून उडी मारून पलायन

महिला प्रवाशांनी संबंधित व्यक्तीला घाटकोपर स्थानकात पोलिसांच्या ताब्यात देण्याची धमकी दिली. मात्र, ट्रेन घाटकोपर स्थानकात थांबण्यापूर्वीच त्या व्यक्तीने धावत्या लोकलमधून उडी मारून पळ काढला. त्यानंतर तो रुळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर गेला आणि कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये चढल्याची माहिती आहे.

सीसीटीव्ही तपासणीतही संशयिताचा मागमूस नाही

घटनेनंतर संबंधित महिलांनी घाटकोपर रेल्वे पोलिसांकडे तक्रार दिली. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली तसेच मुलुंड स्थानकात कर्जत लोकलची तपासणीही करण्यात आली. मात्र, तोपर्यंत संशयित व्यक्ती ट्रेनमधून उतरल्यामुळे तो सापडू शकला नाही.

लोकलमधील व्हायरल व्हिडिओ पाहा

आरपीएफकडून गुन्हा दाखल

या प्रकरणी आरपीएफने भारतीय रेल्वे कायद्यांतर्गत लेडीज डब्यात अनधिकृत प्रवास केल्याबाबत गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, लोकल ट्रेनमधील महिला सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in