Mumbai : 'जय हो' बंद होणार? ब्रिच कँडी रहिवाशांच्या तक्रारीनंतर 'मेलोडी रोड' बंद करण्याचा निर्णय

मुंबईतील कोस्टल रोडवरील 'मेलोडी रोड'वरून होणाऱ्या सततच्या आवाजामुळे ब्रिच कँडी रहिवाशांनी तक्रार केल्यानंतर हा मार्ग तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेकडून पुढील ध्वनी अभ्यासही केला जाणार आहे.
Mumbai : 'जय हो' बंद होणार? ब्रिच कँडी रहिवाशांच्या तक्रारीनंतर 'मेलोडी रोड' बंद करण्याचा निर्णय
Published on

मुंबईतील कोस्टल रोडवरील म्युझिकल मार्ग म्हणजेच 'मेलोडी रोड' हा अनोखा प्रयोग सुरू झाल्यानंतर अवघ्या महिनाभरातच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ब्रिच कँडी परिसरातील रहिवाशांकडून सतत होणाऱ्या आवाजाबाबत तक्रारी आल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने हा रस्ता तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

आवाजामुळे रहिवाशांचा त्रास

कोस्टल रोडवरील नरिमन पॉइंट ते वरळी मार्गावर तयार करण्यात आलेल्या या म्युझिकल मार्ग म्हणजेच 'मेलोडी रोड'वरून वाहने ७० ते ८० किमी वेगाने गेल्यावर 'जय हो' गाण्याची धून वाजत होती. मात्र, या सततच्या आवाजामुळे विशेषतः सकाळी आणि रात्री रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार करण्यात आली.

ब्रिच कँडी परिसरातील सुमारे ६५० हून अधिक कुटुंबांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत या प्रकल्पामुळे शांतता भंग होत असल्याचे नमूद केले. "खिडक्या उघडून ठेवणेही कठीण झाले आहे. सततचा आवाज त्रासदायक ठरत आहे," असे रहिवाशांनी म्हटले आहे.

तात्पुरता बंद, विशेष दिवशीच सुरू होणार?

महापालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्राथमिक ध्वनीपातळी मोजमाप नियमांनुसार मर्यादेत असले तरी मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने हा रस्ता सध्या बंद करण्यात आला आहे. भविष्यात हा 'मेलोडी रोड' केवळ विशेष प्रसंगी किंवा विकेंडला सुरू ठेवण्याचा विचार केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने तज्ञांकडून अधिक सविस्तर ध्वनी अभ्यास करण्याचे निर्देश दिले असून, विशेषतः रात्रीच्या वेळी होणाऱ्या आवाजाचा परिणाम तपासला जाणार आहे. त्यानुसार आवश्यक बदल करण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

परदेशात यशस्वी, मुंबईत मात्र अडचणी

जपान, हंगेरी आणि दक्षिण कोरिया यांसारख्या देशांमध्ये 'मेलोडी रोड' संकल्पना यशस्वी ठरली आहे. मात्र, घनदाट लोकवस्ती असलेल्या मुंबईसारख्या शहरात अशा प्रयोगांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी या घटनेतून स्पष्ट झाल्या आहेत.

दरम्यान, ११ फेब्रुवारी रोजी सुमारे ६ कोटी रुपयांच्या खर्चातून नरिमन पॉइंट ते वरळी दरम्यान हा म्युझिकल मार्ग उभारण्यात आला होता. आता रहिवाशांच्या विरोधामुळे हा प्रकल्प पुढे कसा राबवला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in