मुंबईच्या पहिल्या पूर्णतः भुयारी असलेल्या मेट्रो ३ (Aqua Line) ला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. वरळी ते कफ परेड हा अंतिम टप्पा सुरू झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत मेट्रो ३ च्या प्रवासीसंख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. कोलाबा–बांद्रा–सीप्झ (SEEPZ) असा ३३.५ किलोमीटरचा संपूर्ण मार्ग सुरू झाल्यामुळे दक्षिण व उत्तर मुंबईतील प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ झाला आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, अंतिम टप्पा सुरू होण्यापूर्वी सप्टेंबर महिन्यात मेट्रो ३ ने १९.७ लाख प्रवाशांची नोंद केली होती. मात्र ९ ऑक्टोबरपासून संपूर्ण मार्ग खुला झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये प्रवासीसंख्या थेट ३८.६३ लाखांवर पोहोचली. त्यानंतर, नोव्हेंबरमध्ये ४४.५८ लाख, तर डिसेंबरमध्ये ४६.५६ लाख प्रवाशांनी मेट्रो ३ ने प्रवास केला, ज्यामुळे प्रवासीसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रोजच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ
मिळालेल्या माहितीनुसार, अंतिम टप्प्याआधी आठवड्यातील कामकाजाच्या दिवशी मेट्रो ३ ची सरासरी प्रवासी संख्या ७५,०५२ इतकी होती. मात्र, ऑक्टोबरमध्ये ही संख्या १.२३ लाखांवर पोहोचली. नोव्हेंबरमध्ये १.३२ लाख, तर डिसेंबरमध्ये सरासरी १.४८ लाख प्रवाशांनी दररोज मेट्रो ३ ने प्रवास केला. १६ ऑक्टोबरला आतापर्यंतची सर्वाधिक एकदिवसीय प्रवासीसंख्या नोंदवण्यात आली असून त्या दिवशी १.८२ लाख प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला.
सेवा वाढवण्याचा निर्णय
वाढत्या प्रवासी संख्येला सामोरे जाण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) ने ५ जानेवारीपासून मेट्रो ३ च्या सेवांमध्ये वाढ केली आहे. आठवड्यातील कामकाजाच्या दिवशी फेऱ्या २६५ वरून २९२ करण्यात आल्या आहेत. शनिवारी २०९ ऐवजी २३६ फेऱ्या सुरू असून, रविवारी मात्र पूर्वीप्रमाणे १९८ फेऱ्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. पीक अवर्समध्ये गाड्यांमधील वेळ ६ मिनिटांवरून सुमारे ३ मिनिटांपर्यंत कमी करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
महत्त्वाच्या स्थानकांवर सर्वाधिक गर्दी
इतर मेट्रो मार्ग व उपनगरीय रेल्वेशी जोडलेल्या स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान मरोळ नाका स्थानकावर १६.४५ लाख प्रवाशांची ये-जा झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर १०.२८ लाख, बीकेसी स्थानकावर ७.३ लाख, तर सिद्धिविनायक (प्रभादेवी) आणि सांताक्रूझ स्थानकांवर प्रत्येकी ६.६६ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.
लास्ट-माईल कनेक्टिव्हिटीवर भर
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL)च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "पुढील काळात लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी मजबूत करून प्रवासी संख्या आणखी वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. बीकेसी, वरळी, आरे-जेव्हीएलआर आणि सीएसएमटी येथे Cityflo बस सेवेशी जोडणी करण्यात आली असून, याचे भाडे ९ रुपयांपासून सुरू होते. मागणीनुसार पीक अवर्समध्ये बसची वारंवारता १० मिनिटांपर्यंत वाढवली जाणार आहे."