
मुंबईकरांसाठी प्रवास अधिक सोपा आणि आरामदायी करण्याच्या दिशेने मुंबई मेट्रो ३ ने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुंबई मेट्रो ३ ने आता ‘सिटीफ्लो’ या प्रीमियम बस सेवेबरोबर भागीदारी केल्याची घोषणा केली आहे. यामुळे प्रवाशांना मेट्रो स्थानकांपासून त्यांच्या ऑफिस, घर किंवा इतर ठिकाणी पोहोचणे आणखी सोयीचे होणार आहे.
मुंबई मेट्रो ३ ने या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे. "तुमच्या शेवटच्या मैलाच्या प्रवासातील अडचणींना आता उपाय मिळणार," अशा आशयाचे कॅप्शन देत त्यांनी ही सेवा जाहीर केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ही सेवा बीकेसी, वरळी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) या प्रमुख स्थानकांवर उपलब्ध होणार आहे. गर्दीच्या वेळेत दर १० मिनिटांनी बस धावतील आणि प्रवाशांना निश्चित सीट मिळेल, अशी माहिती देण्यात आली आहे.
मुंबईकरांना परवडणारी तिकीट
या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवासी सिटीफ्लो अॅप किंवा मेट्रोकनेक्ट ३ अॅपद्वारे आपली सीट आधीच बुक करू शकतात. तिकीट दर फक्त २९ रुपयांपासून सुरू होत असल्याने ही सेवा दैनंदिन प्रवाशांसाठी परवडणारी ठरणार आहे.
ही भागीदारी मेट्रो ३ च्या ‘अखंड मुंबई’ (सिमलेस मुंबई) या व्यापक योजनेचा भाग आहे. मेट्रो, बस आणि मोबाईल ॲप्स अशा विविध वाहतूक साधनांना एकत्र आणून प्रवाशांना एकसंध आणि अखंड प्रवासाचा अनुभव देण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.