
मुंबईकरांसाठी बहुप्रतिक्षित असलेली भूमिगत मेट्रो लाईन ३ (अॅक्वा लाईन) सार्वजनिक सेवेसाठी गुरुवारी (दि. ९) मोठ्या उत्साहात सुरू झाली. मात्र, पहिल्याच दिवशी प्रवाशांना तांत्रिक अडचणीमुळे त्रास सहन करावा लागला. चर्चगेट स्थानकावरील प्रवेश-निर्गमन (Entry-Exit) फ्लॅप बॅरिअर अचानक बंद पडल्याने संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांचा गोंधळ उडाला तसेच प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
चर्चगेट स्थानकातील बॅरिअरमध्ये अचानक बिघाड झाल्याने ते मध्येच अडकले. त्यामुळे प्रवाशांना प्रवेश करण्यास आणि बाहेर जाण्यास अडथळा निर्माण झाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांना हाताने गेट उघडून प्रवाशांना सोडावे लागले. या प्रसंगाचा व्हिडिओ पत्रकार फैजान खान यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला असून तो काही मिनिटांतच व्हायरल झाला.
व्हिडिओमध्ये दिसतंय, की मोठ्या संख्येने प्रवासी जमले आहेत. मात्र, स्वयंचलित गेट्स ठप्प झाल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला आहे. मोठ्या संख्येने गर्दीही जमली आहे.
काही प्रवाशांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली, की "फक्त काहीच गेट चालू होते, बाकी बंद होते. त्यामुळे गर्दी एवढी वाढली की श्वास घेणंही कठीण झालं."
MMRC कडून सारवासारव
सोशल मीडियावर 'पहिल्याच दिवशी व्यवस्थापन गोंधळले', 'तांत्रिक तयारी अपुरी होती' अशा प्रतिक्रियांचा पाऊस पडला. काहींनी अॅक्वा लाईनची सुरुवात 'उत्साहवर्धक असली तरी अव्यवस्थित' असल्याची टीका केली. यावर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मात्र सारवासारव करत सांगितले की, "तांत्रिक अडचण काही मिनिटांची होती. कर्मचाऱ्यांनी तत्काळ परिस्थिती हाताळली आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले."
व्यवस्थापनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह
सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काही अडचणींचा सामना प्रवाशांना करायला लागला. तरीही, मुंबईकरांनी नव्या मेट्रो सेवेचा मोठ्या संख्येने लाभ घेतला. MMRC च्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी १,५६,४५६ प्रवाशांनी आरे (जेव्हीएलआर) ते कफ परेड दरम्यान प्रवास केला. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ९७,८४६ प्रवाशी आणि रात्री ९ वाजेपर्यंत १,४६,०८७ प्रवाशांनी प्रवास पूर्ण केला.
MMRC ने प्रवाशांची संख्या जाहीर केली असली, तरी पहिल्याच दिवशी झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो व्यवस्थापनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.