मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी मेट्रो लाईन-३ (अक्वा लाईन) च्या सर्व २७ स्थानकांच्या प्रवेश (Entry) व निर्गम (Exit) पासून ३० मीटर परिसरात २४ तास 'नो पार्किंग झोन' लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय कायमस्वरूपी आदेशाद्वारे घेण्यात आला आहे.
कफ परेड ते आरे कॉलनी जोडणारी महत्त्वाची मेट्रो
३३.५ किमी लांबीची मेट्रो लाईन-३ कफ परेड ते आरे कॉलनी असा मार्ग जोडते. ही मेट्रो सेवा ९ ऑक्टोबरला नागरिकांसाठी खुली करण्यात आली असून दक्षिण मुंबई आणि उत्तर उपनगरांदरम्यान जलद व सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे.
२७ स्थानकांभोवती नो-पार्किंग नियम
या निर्णयानुसार पुढील मेट्रो स्थानकांच्या एंट्री-एक्झिटपासून ३० मीटर परिसरात वाहन पार्किंग पूर्णपणे बंद असेल.
कफ परेड, दादर, विधान भवन, शितलादेवी मंदिर, चर्चगेट, धारावी, हुतात्मा चौक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी), सी.एस.एम.टी., बांद्रा कॉलनी, काळबादेवी, सांताक्रुझ, गिरगाव, सी.एस.एम.आय.ए. एअरपोर्ट-टी१, ग्रँट रोड, सहार, जग्गनाथ शंकरशेठ (मुंबई सेंट्रल), सी.एस.एम.आय.ए. एअरपोर्ट-टी २, महालक्ष्मी, मरोळ नाका, सायन्स म्युझिअम, एम.आय.डी.सी. - अंधेरी, आचार्य अत्रे चौक, सिप्झ, वरळी, सिद्धीविनायक, आरे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय
मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या माहितीनुसार, अनेक वाहनचालक मेट्रो स्थानकांच्या प्रवेशद्वाराजवळ वाहन पार्क करत असल्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत होते आणि प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
अधिकृत आदेशात नमूद करण्यात आले आहे की, "मेट्रो स्थानकांच्या प्रवेश व निर्गमद्वारांजवळ वाहन पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने या परिसराला कायमस्वरूपी 'नो पार्किंग' क्षेत्र घोषित करणे आवश्यक आहे." त्यामुळे या ३० मीटर परिसरात २४ तास पार्किंग बंद राहणार आहे.
अक्वा लाईनला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद
मेट्रो लाईन-३ शहरातील अनेक व्यावसायिक केंद्रे, शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे आणि प्रमुख शॉपिंग हब यांना जोडते. सेवा सुरू झाल्यापासून या मेट्रोला मुंबईकरांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून ती दररोजच्या प्रवासाचा महत्त्वाचा पर्याय बनली आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात मेट्रो लाईन-३ वर एकूण ३८.६३ लाख प्रवाशांनी प्रवास केला, तर दररोज सरासरी १,४१,०२४ प्रवासी या मार्गाचा वापर करत आहेत.
CSMT परिसरातील वाहतूक कोंडीत घट
गेल्या वर्षी मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसरातील वाहतूक कोंडी सुमारे ३० टक्क्यांनी कमी झाली आहे.
प्रशासनाच्या मते, मेट्रोमुळे रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत झाली असून शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठा आधार मिळाला आहे.