

मुंबई मेट्रो लाईन ९ सुरू झाल्यानंतर काशीगाव मेट्रो स्थानकावर प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं आहे. प्रवेश-निर्गम ((Entry/Exit) ) मार्ग अपूर्ण असल्याने लांबच लांब रांगा लागत असून, वाहतूक कोंडी आणि पार्किंग समस्याही वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
रांगा, गोंधळ; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
माहितीनुसार, मेट्रो लाईन ९ (रेड लाईन) सुरू झाल्यानंतर मोठ्या संख्येने प्रवासी या मार्गाचा वापर करत आहेत. मात्र, काशीगाव स्थानकावर फक्त ‘A’ आणि ‘D’ हे दोनच प्रवेश-निर्गम मार्ग सुरू असल्याने उर्वरित मार्गांवर काम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्थानकाबाहेर मोठी गर्दी आणि गोंधळाची परिस्थिती दिसून येत आहे.
वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न गंभीर
काशीगाव स्थानकाबाहेरील वाहतूक कोंडी आणि पार्किंग समस्याही गंभीर असल्याचं पाहणीदरम्यान निदर्शनास आलं. या सर्व समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश सरनाईक यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
MMRDA आणि प्रशासनाला २ महिन्यांची मुदत
परिवहन मंत्र्यांनी MMRDA आणि स्थानिक प्रशासनाला सर्व समस्या दोन महिन्यांत सोडवण्याचे निर्देश दिले. तसेच, प्रलंबित प्रवेश-निर्गम मार्गांचे काम तातडीने पूर्ण करण्यास सांगितलं.
माहितीनुसार, काही तांत्रिक अडचणी आणि जमीन मालकांकडून होणाऱ्या विरोधामुळे चारपैकी दोन प्रवेश-निर्गम मार्गांचं काम प्रलंबित आहे. या अडथळ्यांवर तोडगा काढत काम त्वरीत सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून, आवश्यक असल्यास पोलिस कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले.
पार्किंग प्लाझासाठी प्रस्ताव
काशीगाव स्थानकाजवळील जमिनीबाबतही चर्चा झाली असून, केवळ १३३ मीटर जागा देण्याऐवजी संपूर्ण भूखंड MMRDA कडे हस्तांतरित करून ‘पार्किंग प्लाझा’ उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
मेट्रो लाईन ९चा पहिला टप्पा सुरू
दरम्यान, मेट्रो लाईन ९चा पहिला टप्पा दहिसर पूर्व ते काशीगाव दरम्यान ७ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरू करण्यात आला. सुमारे ५.६ किलोमीटर लांबीच्या या उंचावरील मार्गावर दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मिरागाव आणि काशीगाव ही चार स्थानके आहेत.
ही लाईन मेट्रो लाईन ७शी जोडण्यात आली असून, गुंदवली (अंधेरी पूर्व) ते काशीगाव असा थेट प्रवास शक्य झाला आहे. सकाळी ५.५० ते रात्री ११ वाजेपर्यंत सेवा सुरू असून, गर्दीच्या वेळी सहा मिनिटांपेक्षा कमी अंतराने गाड्या धावत आहेत. गुंदवली ते काशीगाव या प्रवासासाठी एकेरी भाडे सुमारे ५० रुपये आहे.