Mumbai : अखेर मेट्रो ९ सुरू! पहिल्या प्रवाशाची भावनिक प्रतिक्रिया; 'हा क्षण आयुष्यभर लक्षात राहील'; Video

मुंबई मेट्रो लाईन ९ चा पहिला टप्पा दहिसर पूर्व ते काशीगावदरम्यान सुरू झाला असून मिरा-भाईंदरकरांसाठी मोठा दिलासा ठरला आहे. पहिल्या प्रवाशाने हा अनुभव ‘ऐतिहासिक’ असल्याचं सांगत उत्साह व्यक्त केला. या नव्या मेट्रो मार्गामुळे प्रवास जलद, सोयीस्कर आणि आरामदायी होणार आहे.
Mumbai : अखेर मेट्रो ९ सुरू! पहिल्या प्रवाशाची भावनिक प्रतिक्रिया; 'हा क्षण आयुष्यभर लक्षात राहील'; Video
Published on

मिरा-भाईंदर परिसरातील लाखो नागरिकांसाठी आजचा दिवस खास ठरला. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई मेट्रो लाईन ९ चा पहिला टप्पा अखेर मुंबईकरांसाठी सुरू झाला असून, शहराशी जलद आणि सोयीस्कर कनेक्टिव्हिटीचा नवा मार्ग खुला झाला आहे.

७ एप्रिल २०२६ रोजी दहिसर पूर्व ते काशीगाव या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. उद्घाटनानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज ८ एप्रिलपासून प्रवाशांसाठी सेवा सुरू करण्यात आली.

ही मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरील रोजची वाहतूक कोंडी आणि गच्च भरलेल्या लोकल ट्रेनचा त्रास कमी होण्याची अपेक्षा आहे. एसी, वेगवान आणि सुरक्षित प्रवासामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

‘हा क्षण आयुष्यभर लक्षात राहील’ ... पहिल्या प्रवाशाची भावनिक प्रतिक्रिया

काशीगाव स्थानकावर आज उत्साहाचं वातावरण होतं. मिरा रोडचे रहिवासी गिरीश बावीस्कर यांनी या नव्या मार्गावर पहिला प्रवास करण्याचा मान मिळवला. मोबाईलवरील डिजिटल तिकीट दाखवत त्यांनी काशीगावहून दहिसरकडे प्रवास सुरू केला.

"पहिला प्रवासी होण्याचा अनुभव मला खास करून घ्यायचाच होता… आणि योगायोगाने हा मान मलाच मिळाला. हा ऐतिहासिक क्षण मला कायम जपून ठेवायचा आहे. हा क्षण आयुष्यभर लक्षात राहील. संपूर्ण टीमवर्कमधून उभं राहिलेलं हे काम आणि स्वप्नातून वास्तवात झालेलं हे रूपांतर खरंच कौतुकास्पद आहे", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांच्या या प्रवासाने मिरा-भाईंदरकरांच्या दशकभराच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाल्याची भावना व्यक्त झाली.

४ स्थानकांचा ५ किमी मार्ग सुरू

या पहिल्या टप्प्यात ५ किलोमीटर लांबीचा उंचावरील मार्ग सुरू करण्यात आला आहे. यात दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मिरागाव आणि काशीगाव ही चार महत्त्वाची स्थानके आहेत.

हा मार्ग आधीच सुरू असलेल्या मेट्रो लाईन ७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) शी थेट जोडला गेला आहे. त्यामुळे आता काशीगावहून अंधेरीतील गुंदवलीपर्यंत प्रवास करताना ट्रेन बदलण्याची गरज नाही. तसेच दहिसर पूर्व येथे इंटरचेंज करून मेट्रो लाईन २ए चा पर्यायही उपलब्ध आहे.

उर्वरित काम सुरू; प्रवाशांची मोठी वाढ अपेक्षित

मेट्रो लाईन ९ चा पहिला टप्पा सुरू झाला असला तरी उर्वरित ८.५ किलोमीटरचा भाग अद्याप बांधकामाधीन आहे. हा मार्ग पुढे भाईंदरमधील सुभाषचंद्र बोस स्टेडियमपर्यंत वाढवण्यात येणार आहे.

२०३१ पर्यंत दररोज सुमारे ११ लाख प्रवासी या मार्गाचा वापर करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मिरा-भाईंदरसह उत्तरेकडील उपनगरांच्या प्रवासात मोठा बदल होणार असून, शहराच्या वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in