Mumbai : स्टंट करताना वरुण धवन कॅमेऱ्यात कैद; Video व्हायरल होताच मेट्रो प्रशासनाचा इशारा

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये वरुण धवन मेट्रो कोचमधील वरच्या लोखंडी रॉडला लटकून पुल-अप्स करताना दिसत आहे. यावेळी इतर प्रवासी त्याच कोचमध्ये उपस्थित होते.
Mumbai : स्टंट करताना वरुण धवन कॅमेऱ्यात कैद; Video व्हायरल होताच मेट्रो प्रशासनाचा  इशारा
Published on

अभिनेता वरुण धवन सध्या त्याचा नवा चित्रपट Border 2 (बॉर्डर २) ला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे चर्चेत आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, मुंबई मेट्रोतील एका कृतीमुळे तो वादात सापडला आहे. मेट्रो कोचमध्ये पुल-अप्स करतानाचा त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

माहितीनुसार, शनिवारी (दि.२४) वरुण धवनने शहरातील ट्रॅफिक टाळण्यासाठी आणि थिएटरला सरप्राइज भेट देण्यासाठी मुंबई मेट्रोने प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. प्रवासादरम्यान त्याने मेट्रोमधून इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत आपण कोणत्या थिएटरकडे जातोय याचा अंदाज चाहत्यांना लावायला सांगितला. यानंतर सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये वरुण धवन मेट्रो कोचमधील वरच्या लोखंडी रॉडला लटकून पुल-अप्स करताना दिसत आहे. यावेळी कोचमध्ये उपस्थित असलेला एक प्रवासी वरुणच्या कृतीचे अनुकरण करताना व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकाराची दखल घेत मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) यांनी ‘एक्स’ वर वरुणचा व्हिडीओ शेअर करत सुरक्षेचा संदेश दिला. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे, “वरुण धवन, तुमच्या अ‍ॅक्शन चित्रपटांप्रमाणे या व्हिडीओसोबतही ‘डिस्क्लेमर’ असायला हवा होता - ‘महा मुंबई मेट्रोमध्ये हे करू नका’.”

MMMOCL ने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ला टॅग करत स्पष्ट केले की, मेट्रो कोचमधील ओव्हरहेड रॉड्स आणि हँडल्स हे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी असतात. अचानक ब्रेक लागल्यास किंवा हालचालीदरम्यान संतुलन राखण्यासाठी त्यांचा वापर करावा, व्यायाम किंवा स्टंटसाठी नव्हे.

नियम सर्वांसाठी समान

MMMOCLने पुढे सांगितले की, प्रवाशांना त्रास होईल किंवा सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या कृती Metro Railways Operations and Maintenance Act, 2002 अंतर्गत गुन्हा ठरू शकतात. अशा प्रकारांवर दंडाची तरतूद असून, गंभीर प्रकरणात कारावासाची शिक्षा देखील होऊ शकते. नियम हे सर्वांसाठी समान असून लोकप्रियता किंवा सेलिब्रिटी असणे याला अपवाद नाही, असेही मेट्रोने सोशल मिडियाद्वारे स्पष्ट केले.

दरम्यान, अनेक प्रवाशांनी अशा कृतींचा अनुकरण होण्याचा धोका व्यक्त केला आहे. गर्दीच्या कोचमध्ये अशा स्टंटमुळे अपघात होण्याची किंवा प्रवासात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही मत व्यक्त करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in