

मुंबई : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर धावणाऱ्या मुंबई मेट्रो वनने प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचा अनुभव अधिक सुलभ करण्यासाठी ‘डिजिटल पास’ सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनच मेट्रोचा ट्रिप पास किंवा स्टोअर व्हॅल्यू पास खरेदी करता येणार असून, तो मोबाईलमध्ये डिजिटल स्वरूपात ठेवून प्रवास करता येणार आहे. भारतातील व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पूर्णपणे जारी होणाऱ्या पहिल्या मेट्रो पासपैकी ही सुविधा असल्याचा दावा मुंबई मेट्रो वनने केला आहे.
मुंबई मेट्रो वनने नोव्हेंबर २०२२ मध्ये व्हॉट्सॲप ई-तिकीटिंग सुविधा सुरू केली होती. त्याद्वारे प्रवाशांना स्वतंत्र ॲप डाउनलोड न करता व्हॉट्सॲपवरून एकेरी प्रवासाचे क्यूआर तिकीट काढता येत होते. आता डिजिटल पासच्या माध्यमातून नियमित प्रवाशांसाठी पास-आधारित प्रवासाची सुविधाही याच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यात आली आहे.
तर स्टोअर व्हॅल्यू पास हा अनियमित किंवा बदलत्या स्वरूपाचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या पासचा लाभ घेता येईल. प्रवासी आपल्या इच्छेनुसार रक्कम पासमध्ये जमा करू शकतील. प्रत्येक प्रवासासाठी लागू असलेले भाडे आपोआप उपलब्ध शिल्लक रकमेतून वजा केले जाईल. गरजेनुसार हा पास डिजिटल पद्धतीने पुन्हा रिचार्ज करता येणार आहे.
दोन प्रकारचे पास
दोन प्रकारचे डिजिटल पासची सेवा सुरू करण्यात आले आहेत. ट्रिप पास हा नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा पास उपयुक्त ठरणार आहे. प्रवासी आधीच ठरावीक संख्येच्या प्रवासांचा पास खरेदी करू शकतील. पासमधील प्रवास उपलब्ध राहतील आणि प्रत्येक प्रवासासाठी स्वतंत्र तिकीट काढण्याची आवश्यकता भासणार नाही.