

मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासाला आता आणखी डिजिटल आणि सोयीस्कर पर्याय मिळाला आहे. मुंबई मेट्रोचं तिकीट आता थेट Rapido ॲपवरून बुक करता येणार असून, प्रवाशांना तिकीटासाठी रांगेत थांबावं लागणार नाही. ONDC (Open Network for Digital Commerce) प्लॅटफॉर्मद्वारे सुरू करण्यात आलेल्या या सुविधेमुळे मेट्रो प्रवास अधिक जलद, कॅशलेस आणि सुलभ होणार आहे.
कोणत्या मेट्रो मार्गांसाठी सुविधा?
Rapido ॲपवरून सध्या मुंबई मेट्रोच्या २A, २B, ७ आणि ९ या मार्गांसाठी QR आधारित तिकीट बुक करता येणार आहे. प्रवाशांना ॲपवरून थेट तिकीट मिळेल आणि स्टेशनवर QR स्कॅन करून प्रवेश करता येईल.
तिकीट बुक करण्याची सोपी प्रक्रिया
मेट्रो तिकीट बुक करण्यासाठी Rapido ॲपमध्ये जाऊन प्रवासाचा मार्ग निवडायचा, QR तिकीट जनरेट करायचं आणि थेट प्रवास सुरू करायचा. यामुळे रोख पैसे, टोकन किंवा काउंटरवरील रांग टाळता येणार आहे.
नव्या युजर्ससाठी खास ऑफर
डिजिटल तिकीट वापर वाढवण्यासाठी Rapido कडून खास ऑफर जाहीर करण्यात आली आहे.
नव्या युजर्सना पहिली मेट्रो राइड मोफत मिळणार
५० रुपयांपर्यंतच्या पहिल्या प्रवासावर सूट
विद्यमान युजर्सना पहिल्या मेट्रो बुकिंगवर ५० टक्के सूट
सवलत कमाल १० रुपयांपर्यंत लागू
डिजिटल ट्रॅव्हलच्या दिशेने आणखी एक पाऊल
ही सुविधा ONDCच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी मुंबई वन ॲपद्वारे कॉमन मोबिलिटी प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला होता. आता मेट्रो तिकीट प्रणाली विविध ॲप्समध्ये जोडली जात असून, प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होत आहेत.
१६ पेक्षा जास्त प्लॅटफॉर्मवर तिकीट सुविधा
सध्या मुंबई मेट्रो तिकीट सेवा १६ हून अधिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. Uber, WhatsApp यांसारख्या लोकप्रिय ॲप्सनंतर आता Rapido देखील या यादीत सामील झाला आहे. आगामी काळात आणखी ॲप्सशी जोडणी होण्याची शक्यता आहे.
मुंबईकरांसाठी स्मार्ट प्रवासाचा अनुभव
मुंबईतील लाखो प्रवाशांसाठी ही सुविधा वेळ वाचवणारी ठरणार आहे. स्टेशनवरील प्रतीक्षा कमी होईल, कॅशलेस व्यवहार वाढतील आणि रोजचा प्रवास अधिक स्मार्ट व सोयीस्कर होईल.