मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने विविध गृहनिर्माण प्रकल्पातील २ हजार ३० घरांच्या विक्रीसाठी काढलेल्या लॉटरीला अर्जदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. लॉटरीसाठी तब्बल १ लाख १३ हजार ५७७ अर्ज मंडळाला प्राप्त झाले आहेत. निव्वळ अर्जाच्या शुल्कातून म्हाडा मालामाल झाली असून एकही फ्लॅट न विकता म्हाडाला सहा कोटींची कमाई झाली आहे.
म्हाडा मुंबई मंडळामार्फत २ हजार ३० घरांच्या विक्रीसाठी १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत होती. तर १९ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करण्याची संधी देण्यात आली होती. या मुदतीत तब्बल १ लाख ३४ हजार ३५० लॉटरीचे अर्ज प्राप्त झाले. यापैकी १ लाख १३ हजार ५७७ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. एक अर्ज भरण्यासाठी अर्ज शुल्क ५९० रुपये करासहित आकारण्यात आले आहेत. प्राप्त झालेल्या अर्जांची लॉटरी ८ ऑक्टोबर रोजी काढली जाणार आहे.