

मुंबईतील मेट्रो प्रवाशांना गुरुवारी सकाळी एक अनोखा आणि मजेदार अनुभव आला. लोअर ओशिवरा मेट्रो स्थानकात तिकीट-स्कॅनिंग मशीनवर एक माकड अगदी सहजपणे बसून राहिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. रोजच्या धावपळीतील प्रवासात ही अचानक समोर आलेली दृश्ये पाहून प्रवासी एकीकडे चकित तर दुसरीकडे हसू आवरू शकत नव्हते.
नेमकं काय घडलं?
स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळील ऑटोमॅटिक तिकीट-स्कॅनिंग मशीनवर हे माकड निवांत बसलेलं दिसत होतं. दरम्यान, दोन महिला प्रवासी या विचित्र प्रसंगाकडे आश्चर्याने पाहताना व्हिडिओत दिसतात. सभोवताली गर्दी असूनही माकड अजिबात घाबरलेलं नव्हतं. ते शांतपणे लोकांची ये-जा पाहत बसलं होतं.
माकडांच्या वारंवार भेटीची तक्रार
जोगेश्वरी पश्चिमेतील लोअर ओशिवरा मेट्रो स्थानक हे मेट्रो २ए (यलो लाईन)वरील महत्त्वाचं ठिकाण असून, आगामी पिंक लाईन ६ ची जोडणीही येथे होणार आहे. स्थानक परिसरात हिरवाई जास्त असल्याने गेल्या काही महिन्यांत इथे माकडं दिसण्याच्या घटना वाढल्या आहेत, अशी तक्रार स्थानिक प्रवाशांनी केली. काही प्रवाशांचे म्हणणे आहे की, आसपास सुरू असलेल्या बांधकामांमुळेही माकडं मानवी वस्तीजवळ येत असावीत.
प्रवाशांमध्ये सुरक्षेची चिंता
माकडाने कोणालाही त्रास दिला नसला, तरी अशा घटना प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. "स्थानकांवर रोज हजारो लोक प्रवास करतात. अशा ठिकाणी प्राणी सहजपणे प्रवेश करत असतील तर नियमबद्ध तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाय गरजेचे आहेत," असा सूर सोशल मीडियावर उमटतो आहे.
मेट्रो प्रशासनाकडून याबाबत कोणती अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी प्रवाशांनी अशी परिस्थिती तातडीने हाताळण्याची मागणी केली आहे.
मुंबईच्या मेट्रो प्रवासात हसू आणणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.