

तांत्रिक बिघाडांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली मुंबई मोनोरेल सेवा महिनाअखेरीस पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात अंतिम सुरक्षा तपासणी होणार असून, त्यानंतर प्रवासी सेवेला हिरवा कंदील मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) अखत्यारितील २० किलोमीटरचा मोनोरेल मार्ग २० सप्टेंबर २०२५ पासून बंद आहे. वारंवार तांत्रिक अडचणी आणि सेवा विस्कळीत होत असल्याने मोनोरेल सेवा स्थगित करण्यात आली होती.
संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर या मार्गावर एकूण १७ स्थानकांचा समावेश असून, या काळात संपूर्ण नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरणाचे काम करण्यात आले.
अंतिम परवानगीची प्रतीक्षा
माहितीनुसार, बहुतांश आधुनिकीकरणाचे काम पूर्ण झाले असून, आता केवळ अंतिम सुरक्षा मंजुरीची प्रक्रिया बाकी आहे.
या अंतिम टप्प्यात मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तपदाचे निवृत्त आयुक्त पदम सिंह बघेल यांची अनिवार्य सुरक्षा तपासणीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अंतिम प्रमाणपत्रानंतर मोनोरेल सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तांत्रिक तपासणी आणि पायाभूत सुविधांचे मूल्यमापन यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. नेटवर्कमधील जुने तंत्रज्ञान बदलून नवीन यंत्रणा बसवण्यात आल्या असून, कार्यप्रणालीतही सुधारणा करण्यात आल्या आहेत.
नवीन ऑपरेटरची नियुक्ती
मोनोरेल सेवा पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत MMRDA ने ‘पॉवर मेक प्रोजेक्ट्स’ या खासगी कंपनीची पुढील पाच वर्षांसाठी संचालन आणि देखभालीसाठी नियुक्ती केली आहे.
ही कंपनी ट्रेन ऑपरेशन, स्थानक व्यवस्थापन, डेपो हाताळणी आणि देखभाल कामकाजाची जबाबदारी सांभाळणार आहे.
ताफ्यात १० नवीन मोनोरेल रेक्स
मोनोरेल नेटवर्कसाठी १० नवीन मोनोरेल रेक्स ताफ्यात दाखल करण्यात आल्या आहेत. या नव्या रेक्सच्या चाचण्या आणि ट्रायल रन यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
तसेच, स्वतंत्र तपासणी संस्था ‘ब्युरो व्हेरिटास’ने (Bureau Veritas) स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकन (ISA) पूर्ण करून सुधारित यंत्रणेला आवश्यक प्रमाणपत्र दिल्याचंही वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
सध्या केवळ अंतिम सुरक्षा मंजुरीची प्रतीक्षा असून, ती मिळाल्यानंतर अनेक महिन्यांपासून बंद असलेली मोनोरेल सेवा पुन्हा सुरू होणार आहे.
मोनोरेल पुन्हा सुरू झाल्यास मध्य आणि पूर्व मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सुधारित यंत्रणा, अतिरिक्त रेक्स आणि नवीन देखभाल व्यवस्थेमुळे भविष्यात सेवा अधिक सुरक्षित आणि सुरळीत राहील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.