Mumbai : भरपावसात मोनोरेल पुन्हा बंद; प्रवाशांची सुखरूप सुटका, महिन्याभरातील दुसरी घटना

मुंबईत सोमवारी (दि. १५) सकाळी पावसाचा जोर वाढला असतानाच मोनोरेल प्रवाशांना पुन्हा एकदा त्रास सहन करावा लागला. चेंबूरच्या दिशेने निघालेली मोनोरेल वडाळा परिसरात अचानक बंद पडली.
Mumbai : भरपावसात मोनोरेल पुन्हा बंद; प्रवाशांची सुखरूप सुटका, महिन्याभरातील दुसरी घटना
Published on

मुंबईत सोमवारी (दि. १५) सकाळी पावसाचा जोर वाढला असतानाच मोनोरेल प्रवाशांना पुन्हा एकदा त्रास सहन करावा लागला. चेंबूरच्या दिशेने निघालेली मोनोरेल वडाळा परिसरात अचानक बंद पडली. यामुळे अनेक प्रवासी रेलमध्येच अडकले होते. अग्निशमन दलाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांची सुरक्षित सुटका केली. त्यानंतर चेंबूरकडून आलेल्या दुसऱ्या मोनोरेलमध्ये प्रवाशांना बसवण्यात आले. मोनोरेलमध्ये बिघाड होण्याची ही महिन्याभरातील दुसरी घटना आहे.

तांत्रिक बिघाडामुळे अडथळा

तांत्रिक बिघाड या अडथळ्यामागील प्रमुख कारण असल्याचे समजते. अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने मोनोरेल थांबली. अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडगे महाराज स्टेशनहून चेंबूरकडे जात असताना आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास मुकुंदराव आंबेडकर रोड जंक्शनजवळ मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाला.

मोनोरेलच्या तांत्रिक पथकाने मुंबई अग्निशमन दलाला माहिती दिली, ज्यांनी एक विशेष वाहन घटनास्थळी पाठवले. ते पोहोचेपर्यंत तांत्रिक कर्मचाऱ्यांनी सर्व १७ प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले होते. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रेन कपलिंगद्वारे वडाळा येथे आणली गेली. ऑपरेशन पूर्ण झाले आहे, असे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.

या आधीच्या घटनेत ५८२ प्रवाशांची सुखरूप सुटका

महिन्याभरापूर्वी म्हैसूर कॉलनी स्थानकाजवळ याच प्रकारची घटना घडली होती. त्या वेळी तब्बल ५८२ प्रवासी साडेतीन तासांहून अधिक वेळ रेलमध्ये अडकून पडले होते. त्यावेळी खिडक्या तोडून, क्रेन, शिडी आणि लिफ्टच्या साहाय्याने प्रवाशांची सुटका करण्यात आली होती. त्यात १४ जणांना श्वासोच्छवासाच्या तक्रारी उद्भवल्या, तर तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

मागील घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते आणि प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन दिले होते. तरीदेखील केवळ महिनाभराच्या आत दुसऱ्यांदा मोनोरेल बंद पडल्याने प्रवाशांचा त्रास आणि चिंता वाढली आहे.

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मोनोरेल सेवेतील वारंवार होणारे बिघाड प्रवाशांच्या सुरक्षिततेवर आणि सेवाक्षमतेवर गंभीर प्रश्न निर्माण करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in