

मुंबई : दोन महिन्यांवर वरुणराजाचे आगमन होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप नालेसफाईच्या कामाला सुरुवात झालेली नाही. मिठी नदीच्या सफाईसाठी १७ मार्चपर्यंत निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख होती. मात्र कंत्राटदाराचा प्रतिसाद मिळाला नाही. मिठी नदीची सफाई होणार नसेल संपूर्ण मुंबई जलमय होईल, असा आरोप काँग्रेसचे गटनेते आश्रफ आजमी यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे केला.
मिठी नदीची साफसफाई अद्याप सुरू झाली नसल्याचा हुकतीचा मुद्दा काँग्रेसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी उपस्थित केला. मिठीच्या सफाईसाठी अद्याप कंत्राट देण्यात आले नाही. कंत्राटदार प्रतिसाद का देत नाही. सफाई वेळेत झाली नाही व मुंबईची तुंबई झाली तर जबाबदार कोण, असा सवाल यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केला. यावेळी शहरातील बहुतांश नाल्यांची सफाई सुरू न झाल्याकडे नगरसेवकांनी समितीचे लक्ष वेधले. यात अंधेरी सबवेमध्ये तुंबणाऱ्या पाण्याकडे लक्ष वेधत, पाणी तुंबण्यास कारणीभूत असणाऱ्या मोगरा नाल्याची सफाई झाली नसल्याचे ठाकरे सेनेचे यशोधर फणसे यांनी निदर्शनाला आणले. मिठीची सफाई कधी होणार, अशी विचारणा समिती सदस्यांनी केली होती. याबाबतचे निवेदन समितीत करणे आवश्यक होते. पण प्रशासनाला याचे फारसे गांभीर्य नाही. सदस्यांच्या मुद्द्याची दखल घेत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी पुढील आठवड्यात नालेसफाईचा अहवाल समितीत सादर करावा, असे निर्देश दिले.
मिठी नदीची लांबी १७.८४ किमी
एकूण पाणलोट क्षेत्र : ७२९५ हेक्टर
महापालिकेच्या ताब्यातील मिठी: ११.८४ किमी
एमएमआरडीएच्या ताब्यातील मिठी : ६ किमी
नालेसफाई में अखेरपर्यंत लक्ष्य पूर्ण करण्याचे आदेश
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत पावसाळ्यापूर्वीच्या कामांना वेग आला असून 'एन' विभागातील नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांना अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली आहे. या कामांचा शुभारंभ महापौर रितू तावडे यांच्या हस्ते सोमय्या नाल्यावर करण्यात आला. पावसाळ्यात पाणी साचू नये आणि निचरा जलद व्हावा, यासाठी पालिकेकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. 'एन' विभागात एकूण १४ नाल्यांची स्वच्छता केली जाणार असून या नाल्यांची एकत्रित लांबी १५,८८५ मीटर आहे. सोमय्या नाला आणि लक्ष्मीबाग नाला यांसारख्या प्रमुख नात्यांचा यामध्ये समावेश आहे. यंदा एकूण २२,५११ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
महापौर रितू तावडे यांनी यावेळी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देत, पावसाळ्यात पाण्याचा निचरा सुरळीत होणे ही महानगरपालिकेची प्राथमिकता आहे. त्यामुळे गाळ काढण्याची सर्व कामे पारदर्शक पद्धतीने आणि नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत, असे सांगितले. तसेच मे २०२६ अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला परिमंडळ ६ चे कार्यकारी अभियंता, दुय्यम अभियंते राजेंद्र नागरे, समीर कुडालकर, संदीप पवार तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
मिठी नदीची सफाई पालिका करणार
मिठी नदीच्या सफाईसाठी निविदा प्रक्रियेला २४ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही कोणी कंत्राटदार पुढे आला नाही तर पालिका प्रशासनाने मिठी नदीची सफाई करेल यासाठी अभ्यास करण्यात येत आहे. मिठी नदीची सफाई पालिका प्रशासनाने करणे अवघड नाही, पण मनुष्यबळ, मशीन, गाळ वाहून नेणे, हे काम थोडे कठीण आहे. कंत्राटदारांकडे सगळं साहित्य असते. त्यामुळे कंत्राटदार यावा यासाठी अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. तरीही कंत्राटदाराचा प्रतिसाद मिळाला नाही तर पालिका प्रशासन मिठी नदीच्या सफाईसाठी पुढाकार घेईल, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.