

मुंबई : मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयातील एमबीबीएसच्या विद्यार्थ्याला ३ लाख ४३ हजार १०० रुपये वसतिगृह शुल्क भरले नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्याला चक्क १९ लाख ४५ हजार ६९९ रुपये दंडासह २२ लाख ८१ हजार ६९९ रुपये ठोठावला आहे. याबाबतची नोटीस बजावल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, प्रशासनाची कार्यवाही योग्य नसून प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, असे निर्देश आरोग्य समिती अध्यक्ष हरिश भांदिर्गे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.
नायर रुग्णालयात एमबीबीएस पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांनी वेळेत शैक्षणिक शुल्क भरले नाही म्हणून त्यांच्यावर सावकारी दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या या भूमिकेमुळे डॉक्टर झालेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात आहे.
एमबीबीएस शिक्षण पूर्ण झालेल्या एका विद्यार्थ्याला ३ लाख ४३ हजार १०० रुपये शैक्षणिक शुल्क व वसतिगृह शुल्क न भरल्यामुळे १९ लाख ४५ लाख ६९९ दंडासह सुमारे २२ लाख ८१ हजार ६९९ रुपये भरण्याचे नोटीस काढण्यात आली आहे. परंतु एवढे पैसे ग्रामीण भागात राहणाऱ्या आमच्यासारख्या गरीब कुटुंबाने आणायचे कुठून, असा सवाल विद्यार्थ्यांने केला आहे. दंडासह शुल्क न भरल्यामुळे विद्यार्थ्यांनी २०२४-२५ मध्ये इंटर्नशिप पूर्ण करूनही त्यांना इंटर्नशिप पूर्णत्वाचा दाखला (आयसीसी) मिळालेला नाही. यात अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
हा दंड आकारताना महापालिकेने ज्या परिपत्रकाचा आधार घेतला, ते प्रत्यक्षात कीटकनाशके व कंत्राटदार सेवांच्या दरांसाठी आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कास लागू होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली असता दंड आकारणीसाठी १९९० च्या परिपत्रकाचा दाखला देण्यात आला आहे. त्या परिपत्रकानुसार प्रति दिवस फक्त एक रुपया दंड आकारणी नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांवर यापेक्षा अनेक पटीने जास्त दंड आकारल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबतची तक्रार त्यांनी महापौर रितू तावडे यांच्यासह आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भांदिर्डे यांच्याकडे केली आहे.
विद्यार्थ्याला आकारलेला दंड
शैक्षणिक शुल्क - २,८०,०००
शुल्कावरील दंड - ९,२२,५४६
वसतिगृह शुल्क - ५६,०००
वसतिगृह दंड - १०,२३,१५३