

मुंबई : थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईच्या चौपाट्या व अन्य ठिकाणी ३१ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईकरांसह पर्यटकांची गर्दी उसळली होती. नववर्षाच्या स्वागतात मुंबई रमली असताना वरुणराजानेही नववर्षाच्या स्वागतासाठी हजेरी लावली. गुरुवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास सीएसएमटी, दादर, गोरेगाव, चेंबूर भागात पावसाची रिपरिप सुरू होती. डिसेंबर, जानेवारी महिना म्हटले की थंडीचा महिना. या ऐन थंडीत पावसाने हजेरी लावल्याने मुंबईत पुढील काही दिवस हवेत गारवा निर्माण होईल, असे कुलाबा हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
३१ डिसेंबरला २०२५ या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अवघी मुंबापुरी सज्ज झाली होती. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत यासाठी मुंबईकरांनी गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, दादर आदी ठिकाणी गर्दी केली होती. मुंबईकरांनी सरत्या वर्षाला जल्लोषात निरोप दिला तसेच २०२६ या नवीन वर्षांचे उत्साहात स्वागत केले. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी पहाटे मुंबईत पावसानेही हजेरी लावली.
थर्टी फर्स्ट साजरी करून मुंबईकर पहाटे घर गाठत असताना वरुणराजाने एंट्री घेतली आणि मुंबई, ठाण्यासह लगतच्या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये किमान तापमानात घट झाली असून काही ठिकाणी तर तापमानाचा पारा खाली गेला आहे. त्यात पावसाने हजेरी लावल्याने मुंबईत गारवा वाढला आहे.
मुंबईकरांना वायू प्रदूषणापासून दिलासा
गेले काही दिवस मुंबईतील वायू प्रदूषणाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. शहरात ठिकठिकाणी विविध प्रकल्पांचे बांधकाम सुरू असल्याने व वाढत्या वाहनांमुळे हवेचा दर्जा खराब झाला आहे. या वायू प्रदूषणाची न्यायालयानेही दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पावसाच्या हजेरीमुळे मुंबईकरांना वायू प्रदूषणापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.