मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा बदल होणार आहे. शहराला लवकरच पहिली नॉन-एसी, स्वयंचलित बंद दरवाजांची लोकल ट्रेन मिळणार आहे. मुंब्रा येथे झालेल्या भीषण अपघातानंतर उघड्या दरवाज्यांमुळे होणाऱ्या दुर्घटनांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर सेंट्रल रेल्वेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या नव्या लोकल रेल्वेचे फोटो एका ‘X’ हॅन्डलवर शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर याबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आतापर्यंत बंद दरवाज्यांची सुविधा केवळ एसी लोकलपुरती मर्यादित होती. त्यामुळे नॉन-एसी लोकलमध्येही ही सुविधा येणार असल्याने प्रवाशांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहेत. तसेच, काही प्रवाशांकडून चिंताही व्यक्त केली जात आहे.
गजबजलेल्या मार्गावर होणार चाचणी
मिळालेल्या माहितीनुसार, ही नॉन-एसी, बंद दरवाज्यांची लोकल सध्या तयार असून, लवकरच तिची चाचणी घेतली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते कल्याण हा मुंबईतील सर्वाधिक गर्दीचा मार्ग मानला जातो. त्यामुळे याच मार्गावर चाचणी घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चाचण्यांदरम्यान दरवाज्यांची कार्यक्षमता, हवेशीरपणा, प्रवाशांची हालचाल, तसेच गर्दीच्या वेळेतील प्रवासाचा एकूण अनुभव यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. चाचण्यांचे निष्कर्ष सकारात्मक ठरल्यास, ही प्रणाली अन्य मार्गांवरही लागू केली जाऊ शकते.
मुंब्रा अपघातानंतर सुरक्षेवर भर
मुंब्रा येथे झालेल्या अपघातात गर्दीमुळे लोकलमधून प्रवासी खाली पडून अनेकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेने गर्दीच्या वेळेत उघड्या दरवाज्यांजवळ उभे राहणे आणि चालत्या लोकलमधून बाहेर लटकणे धोकादायक असल्याचे उघड झाले होते. स्वयंचलित बंद दरवाज्यांमुळे अशा प्रकारच्या अपघातांवर काही प्रमाणात तरी नियंत्रण मिळू शकते, असा विश्वास रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.
सोशल मीडियावर मतभेद
या निर्णयाबद्दल सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, मतभेद दिसून येत आहेत. काही नेटिझन्सनी बंद दरवाज्यांच्या नॉन-एसी डब्यांमध्ये हवेशीरपणा मोठी समस्या ठरू शकते, अशी चिंता व्यक्त केली आहे. गर्दीच्या वेळेत भरलेल्या डब्यांमध्ये प्रवास केल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, असे मतही व्यक्त केले जात आहे. तर दुसरीकडे काही युजर्सने या निर्णयाचे समर्थन करत, सर्व तांत्रिक आणि सुरक्षेच्या बाबी तपासूनच हा निर्णय घेण्यात आला असावा, असे मत व्यक्त केले आहे.
चाचण्यांकडे प्रवाशांचे लक्ष
सुरक्षा आणि प्रवासातील मूलभूत आराम यामध्ये समतोल साधता येतो का, हे येत्या काळात या चाचण्यांमधून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मुंबईतील लाखो प्रवाशांचे लक्ष आता या नव्या नॉन-एसी, बंद दरवाज्यांच्या लोकलच्या चाचण्यांकडे लागले आहे.