

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी लाँच करण्यात आलेले ‘मुंबई वन’ (Mumbai One) हे बहुप्रतिक्षित ॲप गुरुवारी (९ ऑक्टोबर) सकाळी अधिकृतपणे सुरू झाले. देशातील हे पहिलं एकत्रित डिजिटल मोबिलिटी प्लॅटफॉर्म मानलं जात आहे. मात्र, या ॲपबाबतच्या आयफोन वापरकर्त्यांच्या उत्साहात लगेचच विरजण पडले. कारण हे ॲप Apple App Store वर सर्च केल्यास दिसतच नाही!
iPhone वापरकर्त्यांसाठी तात्पुरता उपाय
सध्या iPhone वापरकर्ते खालील डायरेक्ट लिंकवरून ॲप डाउनलोड करू शकतात :
https://apps.apple.com/in/app/mumbai-one/id6478221525
या लिंकवरून ॲप तात्पुरते इन्स्टॉल करून वापरकर्ते सहज नोंदणी करून स्मार्ट ट्रान्सपोर्ट सेवा सक्रिय करू शकतात. हे अॅप गुरुवारी पहाटे ५ वाजता सुरू झाले असून सकाळी ११ वाजेपर्यंत ५०० हून अधिक डाउनलोड्स नोंदवले गेले.
ॲपची वैशिष्ट्ये
‘मुंबई वन’ हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) विकसित केलेलं ॲप आहे. या प्लॅटफॉर्मचा उद्देश म्हणजे मुंबईतील सर्व सार्वजनिक वाहतूक प्रणाली - मेट्रो, मोनोरेल, लोकल आणि बस सेवा एकाच डिजिटल छत्राखाली आणणे. या अॅपद्वारे BEST, TMT, NMMT, KDMT यांसह ११ वेगवेगळ्या ऑपरेटर्सकडून QR आधारित तिकिटे बुक करता येतात.
QR कोड-आधारित तिकीट बुकिंगची सुविधा
११ वाहतूक ऑपरेटर्ससाठी एकच प्लॅटफॉर्म
मल्टी-मोडल जर्नी प्लॅनर
कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस पेमेंट सुविधा
रिअल-टाइम मार्ग माहिती आणि सेवा अपडेट्स
'या' सुविधा अद्याप उपलब्ध नाहीत
‘मुंबई वन’ अॅप लाँचनंतर वापरकर्त्यांनी काही त्रुटी निदर्शनास आणल्या आहेत.
अॅप Apple App Store वर सर्चमध्ये दिसत नाही.
सध्या सीझन किंवा रिटर्न ट्रेन तिकीट बुकिंगचा पर्याय नाही.
नव्याने सुरू झालेल्या मेट्रो लाईन ३ (फेज २बी - वरळी ते कफ परेड) साठी तिकिटांचे दर आणि मार्गांची माहिती अद्याप अपलोड केलेली नाही.
त्यामुळे सध्या प्रवाशांना जुन्या तिकीट प्रणालीवरच अवलंबून राहावे लागणार.
दरम्यान, MMRDAच्या माहितीनुसार, अॅप वापरकर्त्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही, सर्व खर्च प्राधिकरण उचलणार आहे.