पेढा, पनीरसह मिठाईही महागणार; दक्षिण मुंबईत म्हशीचे दूध ११२ रु. लिटर

मुंबईत मंगळवारपासून म्हशीचे दूध महागणार असल्याने पनीर, पेढा आणि मिठाईचे दर वाढणार आहेत.
पेढा, पनीरसह मिठाईही महागणार; दक्षिण मुंबईत म्हशीचे दूध ११२ रु. लिटर
पेढा, पनीरसह मिठाईही महागणार; दक्षिण मुंबईत म्हशीचे दूध ११२ रु. लिटर 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मनोज रामकृष्णन/मुंबई :

मुंबईत मंगळवारपासून म्हशीचे दूध महागणार असल्याने पनीर, पेढा आणि मिठाईचे दर वाढणार आहेत. मुंबई दूध उत्पादक असोसिएशनने (एमएमपीए) १ सप्टेंबरपासून घाऊक दरात प्रति लिटर ₹९ ची वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे हा दर प्रति लिटर ₹९३ वरून ₹१०२ वर पोहोचेल. या वाढीमुळे उत्तर मुंबईत किरकोळ दर सुमारे ₹११० प्रति लिटर, तर शहराच्या दक्षिण भागात ₹११२ प्रति लिटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे, तर गाईच्या दुधात कोणतीही वाढ केली जाणार नाही.

एमएमपीएचे अध्यक्ष चंद्रकुमार सिंह यांनी सांगितले की, दुभत्या जनावरांची वाढती किंमत, पशुखाद्य आणि चाऱ्याच्या महागलेल्या दरांमुळे ही दरवाढ करणे भाग पडले आहे.दूध महागल्यामुळे पनीर, तूप आणि पारंपरिक मिठाई यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांच्या दरांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. चांगल्या दर्जाच्या पनीरचा दर सुमारे ₹५८० वरून ₹६४० प्रति किलोपर्यंत वाढू शकतो.

घाटकोपरमधील मिठाई विक्रेते दीपक अग्रवाल यांनी सांगितले की, पेढा आणि बर्फी आदी लोकप्रिय मिठायांच्या किमतीत सुमारे १०% वाढ होऊ शकते. साहित्याचा खर्च वाढेल, तरीही घाऊक आणि निम-घाऊक व्यापारी वाढीव खर्चाचा बहुतांश भार स्वतः सहन करतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे अंतिम ग्राहकांवर जास्त परिणाम होणार नाही, असे ते म्हणाले.

एमएमपीएने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत रोज सुमारे ४५ लाख लिटर दुधाचा वापर होतो. यामध्ये म्हशीचे व गाईचे दूध, तसेच दुधाच्या पावडरपासून तयार केलेल्या दुधाचा समावेश आहे. याशिवाय, शहरात विकल्या जाणाऱ्या दुधापैकी काही प्रमाणात कृत्रिम घटक आणि इमल्सीफायर्सची भेसळ असणारे दूध विकले जाते, असा दावाही संघटनेने केला आहे. म्हशीच्या दुधाचे दर हे त्यातील फॅटच्या प्रमाणावर अवलंबून असतात, जे साधारणपणे ५.५% ते ७% किंवा त्याहून अधिक असते. ‘एमएमपीए’चा फॅटसाठी प्रमाणक दर हा ७% आहे. गाईचे दूध, ज्यामध्ये सरासरी ३.५% फॅट असते, ते प्रति लिटर ₹६० ते ₹७० च्या आसपास विकले जाते.

मुंबईतील दुधापैकी २५% दूध गाईचे

संघटनेच्या माहितीनुसार, मुंबईत वापरल्या जाणाऱ्या दुधापैकी केवळ २५% दूध हे गाईचे दूध असते.

पेढा, पनीरसह मिठाईही महागणार; दक्षिण मुंबईत म्हशीचे दूध ११२ रु. लिटर
Mumbai : दूध १०२ रुपये लिटर; घाऊक दरात ९ रुपये वाढ; १ सप्टेंबरपासून सुटे दूध महागणार

सिंह यांनी सांगितले की, मुंबईचे शहराबाहेर उत्पादित होणाऱ्या दुधावरील अवलंबित्व गेल्या काही दशकांत मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

मुंबईतील दुधाचा वापर तिप्पट वाढला

गेल्या ५० वर्षांत मुंबईतील दुधाचा दैनिक वापर १५ लाख लिटरवरून तीन पटीने वाढला आहे, तर शहराची लोकसंख्या जवळपास दुप्पट झाली आहे. लोकांचे वाढते उत्पन्न आणि दुधाचा वाढता वापर हे या वाढीमागचे मुख्य कारण असल्याचे सिंह यांनी सांगितले. मुंबईत शहराच्या हद्दीत १९७५ मध्ये सुमारे ७.५ लाख लिटर दुधाचे उत्पादन होत होते आणि तेवढेच दूध बाहेरून येत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in