Mumbai : कलिंगडामुळे नव्हे विषबाधेने झाला मृत्यू

डोकाडिया कुटुंबातील चार जणांच्या संशयास्पद मृत्यूचे कारण कलिंगड खाणे नसून विषबाधा असल्याचे प्राथमिक वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे.
कलिंगडामुळे नव्हे विषबाधेने झाला मृत्यू
कलिंगडामुळे नव्हे विषबाधेने झाला मृत्यू
Published on

पूनम अपराज/मुंबई :

डोकाडिया कुटुंबातील चार जणांच्या संशयास्पद मृत्यूचे कारण कलिंगड खाणे नसून विषबाधा असल्याचे प्राथमिक वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. मृतांपैकी एकाच्या रक्तामध्ये मॉर्फिन आढळून आल्याने संशय आणखी बळावला आहे.

कलिंगडामुळे नव्हे विषबाधेने झाला मृत्यू
Mumbai : आधी खाल्ली बिर्याणी, मग कलिंगड... एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू; अन्नातून विषबाधेचा संशय

अब्दुल्ला डोकडिया हे व्यावसायिक होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी नसरीन, आणि मुली आयेशा व सैनब यांचा मृत्यू झाला. ते मुघल इमारत, घाटी गल्ली, पायधुनी येथे राहत होते. सुरुवातीच्या माहितीनुसार, शनिवारी या कुटुंबाने चिकन पुलाव, ताक आणि कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर ते आजारी पडले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यातील विषबाधेचे नेमके कारण काय आणि घातपात आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.

नवी मुंबई एपीएमसीत कलिंगड विक्रेते हवालदिल; अफवांमुळे विक्रीत ३० टक्के घट

पायधुनी येथे कलिंगड खाल्ल्यानंतर चार जणांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरल्याने नवी मुंबईतील एपीएमसीतील कलिंगड ठोक विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या अफवेचा थेट परिणाम बाजारावर झाला असून कलिंगड विक्रीत सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी घट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

सध्या कडक उन्हाळ्यामुळे कलिंगडाला चांगली मागणी असताना अचानक या अफवेने बाजाराचे गणितच बदलले आहे. काही दिवसांपूर्वी १७ ते २० रुपये प्रतिकिलो दराने विकले जाणारे कलिंगड आता ८ ते १० रुपये प्रतिकिलो दराने विकावे लागत आहे. तरीही ग्राहकांचा प्रतिसाद अत्यल्प असल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत.

एपीएमसीतील ठोक विक्रेते नवी मुंबई एपीएमसी मार्केट परिसरात ग्राहकांची वाट पाहत बसावे लागत असल्याचे चित्र आहे. अफवेपूर्वी मालाला चांगला उठाव होता, मात्र आता दिवसेंदिवस विक्री घटत चालली आहे. काही

महानगरपालिकांनी आणि पोलिसांनी रस्त्यावर अनधिकृत फळविक्रीवर कारवाई केल्यानेही किरकोळ ग्राहक वर्ग कमी झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे ठोक विक्रेत्यांचा मोठा ग्राहकवर्ग कमी झाला आहे.

वाशीतील ज्यूस विक्रेते अरविंद गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, ग्राहक आता कलिंगडाचा ज्यूस घेण्यासही टाळाटाळ करत आहेत. काही ग्राहक मिक्स फळांच्या ज्यूसमध्ये कलिंगड न वापरण्याच्या सूचना देत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, २७ एप्रिल रोजी पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासात अन्नातून विषबाधेचा संशय व्यक्त करण्यात आला असून नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. मात्र कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची अफवा पसरल्याने संपूर्ण फळबाजारावर परिणाम झाला आहे. व्यापाऱ्यांनी अफवा थांबवून अधिकृत अहवाल येईपर्यंत जनतेने घाबरून निर्णय घेऊ नये, अशी मागणी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in