"मुखवटा घातलेली प्रत्येक व्यक्ती..."; मुंबई पोलिसांकडून 'ब्रिजर्टन सीझन ४' चा संदर्भ, ‘डिजिटल अरेस्ट’पासून सावध राहण्याचा इशारा

नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय सीरिज ब्रिजर्टन (Bridgerton) चा संदर्भ देत, ऑनलाईन जगात सावध राहण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी सोशल मीडियाद्वारे केले आहे.
"मुखवटा घातलेली प्रत्येक व्यक्ती..."; मुंबई पोलिसांकडून 'ब्रिजर्टन सीझन ४' चा संदर्भ, ‘डिजिटल अरेस्ट’पासून सावध राहण्याचा इशारा
Published on

मुंबई पोलिसांनी आजकालच्या तरुणाईला भावणाऱ्या पॉप कल्चरचा उत्तम वापर करत ऑनलाइन सुरक्षेबाबत एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय सीरिज ब्रिजर्टन (Bridgerton) चा संदर्भ देत, ऑनलाईन जगात सावध राहण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी सोशल मीडियाद्वारे केले आहे.

मुंबई पोलिसांच्या अधिकृत X हॅण्डलवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे, "ऑनलाइन जगात दिसणारी प्रत्येक ‘ओळख’ खरी असेलच असे नाही. जशी ब्रिजर्टन सीरिजमध्ये मुखवट्यांमागे खऱ्या व्यक्तीची ओळख लपलेली असते, तशीच सोशल मीडियावरही प्रत्येक प्रोफाइल किंवा ‘नवीन मित्र’ विश्वासार्ह असेलच असे नाही."

'डिजिटल अरेस्ट' स्कॅममध्ये वाढ

मुंबईत सध्या ‘डिजिटल अरेस्ट’ नावाच्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. या स्कॅममध्ये काही गुन्हेगार स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचं भासवतात. ते व्हिडिओ कॉल करून लोकांना घाबरवतात आणि तुमच्यावर गुन्हा दाखल केला आहे, तुम्ही निगराणीखाली आहात किंवा तुमच्यावर बारकाईने लक्ष आहे, अशा धमक्या देतात.

या भीतीच्या वातावरणात लोकांकडून पैसे उकळले जातात. धक्कादायक म्हणजे शिक्षित आणि टेक-सॅव्ही लोकही या स्कॅमचे बळी ठरत आहेत.

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने या फसवणूक करणाऱ्या टोळ्यांविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. अनेक राज्यांत छापे टाकून अशा टोळ्या उध्वस्त करण्यात आल्या आहेत.

काय आहे ब्रिजर्टन (Bridgerton) मालिका?

ब्रिजर्टन ही रीजेन्सी-युगातील लंडनमध्ये घडणारी प्रेमकथा आणि उच्चभ्रू समाजातील नाट्यमय अस्थिरतेवर आधारित सीरिज आहे. मालिकेत ब्रिजर्टन कुटुंबातील आठ भावंडांच्या प्रेमकथा मांडल्या आहेत.

सीरिजमधील लेडी व्हिसलडाऊन ही व्यक्ती ओळख गुप्त ठेवून समाजातील रहस्य उघड करते. हाच धागा पकडत मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे की, ऑनलाईन जगात कोण आहे ते दिसतं तसंच असेल, याची खात्री नसते.

logo
marathi.freepressjournal.in