
दिवाळी सणाच्या काळात शहरात शांतता, सुरक्षितता आणि प्रदूषणमुक्त वातावरण राखण्यासाठी मुंबई पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी कठोर नियम लागू केले आहेत. गर्दीची आणि संवेदनशील ठिकाणे जसे की धार्मिक स्थळे, रुग्णालये, पेट्रोल पंप, रेल्वे स्थानके, बस डेपो आणि दाट लोकवस्ती असलेले भाग या सर्व ठिकाणी फटाके फोडण्यावर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
दिवाळीच्या दिवशी रात्री १० वाजेपर्यंत नागरिकांना फटाके फोडण्याची परवानगी असेल. या वेळेच्या बाहेर फटाके फोडल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
आवाज आणि प्रदूषण मर्यादा
ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक भागासाठी आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. औद्योगिक भागात दिवसा ७५ डेसिबल आणि रात्री ७० डेसिबलपेक्षा जास्त आवाज होऊ नये. व्यावसायिक भागात दिवसा ६५ आणि रात्री ५५ डेसिबल, तर निवासी भागात दिवसा ५५ आणि रात्री ४५ डेसिबल अशी मर्यादा आहे. याशिवाय, शांतता क्षेत्रांमध्ये जसे की शाळा, मंदिरे आणि रुग्णालये दिवसा ५० आणि रात्री ४० डेसिबलपेक्षा जास्त आवाज करण्यास सक्त मनाई आहे. नागरिकांनी या मर्यादांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
फटाक्यांवर मर्यादा
मुंबई पोलिसांचे सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले की, “पोलिस विभाग सणाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पूर्ण सज्ज आहे. नागरिकांनी शांततेत, सुरक्षिततेत आणि जबाबदारीने सण साजरा करावा. कुठलीही संशयास्पद हालचाल किंवा कायद्याचे उल्लंघन दिसल्यास त्वरित पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी.” त्यांनी पुढे सांगितले की, “ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध आणि आजारी लोकांना गंभीर त्रास होतो. म्हणूनच फटाक्यांवर मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत.”
सुरक्षेत वाढ
वरिष्ठ वाहतूक पोलिस अधिकारी अनिल कुंभारे यांनीही नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले. “प्रमुख रस्ते, उड्डाणपूल आणि जंक्शनवर फटाके फोडून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाईल,” असे ते म्हणाले. दिवाळीच्या काळात शहरातील प्रमुख चौक, सिग्नल आणि बाजारपेठांमध्ये अतिरिक्त पोलिस आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पेट्रोलिंग आणि सीसीटीव्ही देखरेख वाढवण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी नागरिकांना प्रदूषणमुक्त, सुरक्षित आणि आनंदी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. फटाक्यांऐवजी दिवे, सजावट आणि पर्यावरणपूरक उपाय वापरून सण साजरा करण्याचा संदेशही देण्यात आला आहे.