

गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली असून, नागरिकांनी तब्बल ८ हजार तक्रारी बीएमसीकडे नोंदवल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिले आहेत.
मंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवारी (दि.२२) घेतलेल्या तातडीच्या बैठकीत बीएमसी, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि इतर संबंधित यंत्रणांना युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश दिले. “गणेशोत्सवापूर्वी प्रत्येक रस्ता खड्डेमुक्त झाला पाहिजे. कामात दिरंगाई झाल्यास कठोर कारवाई होईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
'मॅस्टिक डांबर तंत्रज्ञानाचा' वापर
रस्त्यांची दुरुस्ती अधिक प्रभावीपणे करण्यासाठी ‘मॅस्टिक डांबर तंत्रज्ञान’ वापरण्याचे आदेश शेलार यांनी दिले. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाकोला, विक्रोळी आणि गोरेगाव उड्डाणपुलांवरील खड्डे तातडीने बुजवण्याचेही त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.
दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावा, असे शेलार यांनी स्पष्ट केले. “एमएसआरडीसीने वेळेत कारवाई केली नाही, तर बीएमसीने स्वतः हे काम हाती घ्यावे,” असेही ते म्हणाले. दरम्यान, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बीएमसीने रस्त्यांची दुरुस्ती सुरू केली असल्याचे सांगितले.