
सोमवारी रात्रीपासून मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली. उकाड्याने हैराण मुंबईकरांना ऐन मार्च महिन्यात गारव्याची अनुभूती मिळाली. मंगळवारी पहाटे अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता. उपनगरांमध्येही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मुंबईसह ठाण्यामध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली.
सध्या मुंबईमध्ये ढगाळ वातवारण असून हवेमध्ये गारवा निर्माण झाला आहे. मात्र, पहाटेच्या या पावसामुळे मुंबईच्या लोकलवर परिणाम झालेला पाहायला मिळाला. पावसाचा मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर परिणाम झाला. पनवेल ते सीएसटीच्या लोकल अर्ध्या तासाने उशिरा धावत होत्या. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रेल्वे मार्गात अडथळे आल्याने वेळापत्रकात बदल झाला. मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गांवर धावत असलेल्या गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. तसेच, पश्चिम रेल्वेवरही अनेक गाड्या या उशिराने धावत होत्या. या पावसामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.