

मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने ऐन ‘ऑक्टोबर हिट’मध्ये मुंबई परिसरात रविवारी दुपारनंतर पावसाने झिम्मा सुरू केल्याने मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका झाली. मुंबईसह राज्यातील अनेक भागात रविवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मुंबईकरांनी या जोरदार पावसाचा आनंद लुटला. दरम्यान, पुढील चार दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
वातावरणीय बदलामुळे सध्या पाऊसही लहरी झाला आहे. त्यामुळे परतीच्या पावसानंतरही मुंबईसह राज्यातील अनेक भागात पावसाने रविवारी हजेरी लावली. मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस आता सहा महिने होत आले तरी माघार घेण्याचे नाव घेत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
मुंबईत रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर पावसाचा काहीसा जोर वाढला. मुंबईतील सीएसएमटी, भायखळा, दादर, परळ, विक्रोळी, अंधेरी, बोरिवली भागात पावसाने दमदार हजेरी लावली. रविवारी संध्याकाळनंतर बरसलेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले होते. तसेच काही ठिकाणी वाहतूककोंडी झाली, तर रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरू होती.
पुढील चार दिवस (२७ ते ३० ऑक्टोबरदरम्यान) मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यातील सर्व मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने २५ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत ३५ ते ४५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ५५ किमी प्रतितासपर्यंत जाऊ शकतो.
रविवारचे तापमान
सांताक्रूझ - ३१.३ सेल्सिअस
कुलाबा - ३१.८ सेल्सिअस
शहर भागातील पाऊस
भायखळा - ३५.५७ मिमी,
मेमनवाडा - २८.४० मिमी
ग्रँट रोड - २६.०० मिमी
सीएसएमटी - २४.६० मिमी
कुलाबा - २१.८० मिमी
पश्चिम उपनगर
वांद्रे - २१.४० मिमी,
सांताक्रूझ - १७.२० मिमी
पूर्व उपनगर
मानखुर्द - १५.४० मिमी,
गोवंडी - १४.८० मिमी
चेंबूर - १४.८० मिमी
मुलुंड - १४.२० मिमी
मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना
हवामान विभाग आणि भारतीय तटरक्षक दलाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. समुद्रामध्ये असलेल्या सर्व मासेमारी नौकांनी तत्काळ सुरक्षितपणे बंदरात परत यावे. तसेच स्थानिक बंदर अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
असा पडला पाऊस
रविवारी सकाळी ८.०० ते सायंकाळी ७.०० या कालावधीत शहर भागात - २१.७६ मिमी , पूर्व उपनगर भागात - १४.५१ मिमी, तर पश्चिम उपनगरात - १८.३० मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.
शेतकरी चिंताग्रस्त
पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जात असल्याने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. भातपीक, फळबागांसह भाजीपाल्याचे पावसामुळे अधिक नुकसान होत आहे. तयार झालेल्या भातपिकाच्या लोंब्या सोंगणीनंतर गळू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अजून काही दिवस हवामान विभागाने पाऊस येण्याचा अंदाज वर्तविला असल्याने शेतीची कामे उरकण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. मात्र, अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. पावसाळी हंगाम संपला असतानाही पाऊस होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.