पावसाचे धूमशान! ठाणे-पालघर पट्ट्यात मुसळधार; मुंबईत आजही रेड अलर्ट, रेल्वे उशिराने, उपनगरातील रस्ते पाण्याखाली

शुक्रवार रात्रीपासून पावसाने रौद्ररूप धारण केले असून राज्यभर पावसाचे धूमशान सुरू आहे.
पावसाचे धूमशान! ठाणे-पालघर पट्ट्यात मुसळधार; मुंबईत आजही रेड अलर्ट, रेल्वे उशिराने, उपनगरातील रस्ते पाण्याखाली
पावसाचे धूमशान! ठाणे-पालघर पट्ट्यात मुसळधार; मुंबईत आजही रेड अलर्ट, रेल्वे उशिराने, उपनगरातील रस्ते पाण्याखाली(Photo - FPJ)
Published on

मुंबई : शुक्रवार रात्रीपासून पावसाने रौद्ररूप धारण केले असून राज्यभर पावसाचे धूमशान सुरू आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला शनिवारी दिवसभर मुसळधार पावसाने झोडपून काढले. ठाणे, कल्याण, नवी मुंबई पनवेल, वसई, विरार, पालघरमध्ये अनेक भाग पाण्याखाली गेले. मुंबई, ठाण्यात रविवारी रेड अलर्ट जारी केला आहे. पालघर जिल्ह्यात रविवार, सोमवार दोन दिवस रेड अलर्ट जारी केले असून आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

मुंबईत अवघ्या चार दिवसांत जुलै महिन्याच्या सरासरी पावसापैकी तब्बल ७५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. १ जुलैपासून आतापर्यंत सांताक्रूझ वेधशाळेत ६३८.४ मिमी, तर कुलाबा वेधशाळेत ४८३.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे यंदाच्या मान्सूनचा एकूण पाऊस १,००० मिमीचा टप्पा अवघ्या १२ दिवसांत पार झाला. शनिवारी सकाळी ८ ते दुपारी ३ या सात तासांत विक्रोळी आणि पवई येथे सुमारे २०० मिमी पाऊस झाला. जोगेश्वरीत १६२ मिमी, अंधेरी पूर्वमध्ये १५५.२ मिमी, तर मालाडमध्ये १४७ मिमी पावसाची नोंद झाली. शहर भागात तुलनेने कमी पाऊस झाला असून वडाळा येथे ५५ मिमी आणि सायन येथे ६९ मिमी पाऊस झाला.

अंधेरीतील मोगरा नाल्याला पूर आला, तर अनेक लहान नाले तुडुंब भरल्याने रस्त्यांवर पाणी साचले होते. सर्व्हिस रोड, अंधेरीतील वीरा देसाई रोड, एस. व्ही. रोड, अंधेरी सबवे, विक्रोळीतील हुमा मॉल जंक्शन, गांधीनगर जंक्शन तसेच परेश पार्क मार्केट रोड यांसह अनेक मार्ग तात्पुरते वाहतुकीसाठी बंद केले होते.

वसईत कमरेइतके पाणी

वसईच्या मिठागर वसाहतीत जाणाऱ्या रस्त्यावर कमरेइतकं पाणी साचले होते. या वसाहतीतील सुमारे दीडशे कुटुंब आणि हजाराहून अधिक नागरिकांना कमरेइतक्या पाण्यातून प्रवास करावा लागला. नालासोपारा व वसईदरम्यान रुळावर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक धीम्या गतीने चालू होती. अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या. पालघर-सातपाटी रोडवरील टेंभोडे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्ता जलमय झाले.

मालाड सबवे बंद

पश्चिम उपनगरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अंधेरी एमआयडीसी परिसरात रोल्टा जंक्शन जवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. मालाड सबवेमध्ये २ ते अडीच फूट पाणी भरल्यामुळे तेथील वाहतूक बंद करण्यात आली होती. विलेपार्ले आणि जुहूः विलेपार्ले पूर्व येथील नेहरू रोडवर १ ते दीड फूट पाणी भरल्याने अनेक गाड्या बंद पडल्या. उच्चभ्रू आणि बॉलिवूड कलाकारांचे निवासस्थान असलेल्या जुहू परिसरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते.

डोंबिवली जलमय

मुसळधार पावसामुळे डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसर जलमय झाल्याचं दिसून आलं. स्टेशन परिसरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पाणी साचल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. पाण्यातून वाट काढताना नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

कामगारांची सुटका

कोळगाव पुलावर पाणी साचल्याने पालघर-बोईसर मार्ग बंद करण्यात आला होता. मनोर-वाघोडा घाटाजवळ झाड कोसळल्याने महामार्ग काही काळ रोखला गेला होता. साकवार गावातील वारथा पाडा येथे नदी ओसंडून वाहिल्याने १३ ग्रामस्थ आणि कारखान्यातील कामगारांसह एकूण १९ जण अडकले होते. त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली.

कल्याण, भिवंडी, नवी मुंबई आणि बदलापूरमधील अनेक सखल भागांत पाणी साचले. कळवा येथे झाड अंगावर पडल्याने दोन दुचाकीस्वार जखमी झाले. तर नवी मुंबईतील वाशी येथे झाड पडून एका कारचे नुकसान झाले.

अंबा नदी धोक्याच्या वर

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून पाली, नागोठणे परिसरात जोरदार पाऊस झाल्याने अंबा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. अंबा नदीवरील भेरव-खुरावले फाटा येथील छोट्या पुलावरून पाणी वाहू लागलं आहे. तर पुलापलीकडील महागाव, वाघोशी, भेरव, ताडगाव या गावांचा पालीशी संपर्क तुटला होता.

मेट्रो ठप्प

शनिवारी मुसळधार पावसामुळे मुंबईच्या जनजीवनावर परिणाम झाला असतानाच, मुंबई मेट्रो मार्ग २-ए वर तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. दहिसर पूर्व आणि कांदरपाडा स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मेट्रो सेवा सुमारे अर्ध्या तासासाठी विस्कळीत झाली होती. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत डहाणूकरवाडी ते दहिसर पूर्व स्थानकांदरम्यान एकाच मार्गावरून मेट्रो चालवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, अंधेरी पश्चिम ते डहाणूकरवाडी या भागात मेट्रो सेवा सुरळीत सुरू होती.

या ठिकाणी सर्वाधिक पाऊस बरसला

  • राम मंदिर - २०६.५ मिमी

  • विक्रोळी - १८८ मिमी

  • सांताक्रूझ - १६४.१ मिमी

  • वांद्रे - ११२.० मिमी

  • सायन - १०० मिमी

  • भायखळा ७०.५ मिमी

  • कुलाबा - ७०.२ मिमी

नाल्यात पडून मुलाचा मृत्यू

पालघर तालुक्याच्या बेटेगाव गावातील एक आजोबा आपल्या नातवाला घेऊन घरी जात होते. तेव्हा त्यांचा नातू रस्त्यालगतच्या नाल्यात पडून वाहून गेला. त्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला. सदर मृत बालकाचे नाव अनिकेत दशरथ वाघेला आहे.

गोवंडीत महिला जखमी

गोवंडीतील बैंगणवाडी येथे शनिवारी दुपारी एकच्या सुमारास तळमजला अधिक एक मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याने एक महिला जखमी झाली त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले असून प्रकृती स्थिर आहे.

पांडवकडा धबधब्यावर दोन तरुणांचा मृत्यू

नवी मुंबई : खारघरमधील धोकादायक पांडवकडा धबधबा परिसरात दोन तरुणांचा पाण्याच्या जोरदार प्रवाहात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दोघांचेही मृतदेह अद्याप सापडले नसून पोलीस, अग्निशमन दल आणि बचाव पथकाकडून शोधमोहीम सुरू आहे. ३ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या तळोजा फेज-१ येथील सुमारास सागरविहार बिल्डिंग, जनता गॅरेजजवळ राहणारा मोहम्मद मोबशीर मोहम्मद शाहिद (२०) हा पांडवकडा धबधब्याच्या परिसरात पाण्याच्या वेगवान प्रवाहात बुडाला. त्यानंतर ४ जुलै रोजी सांताक्रूझ (कलिना) येथील कोबावरी व्हिलेजमधील रहिवासी शेण्णोन गॅस्पर किनी (१९) हाही त्याच परिसरात पाण्याच्या प्रवाहात बुडाला.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in