

मुंबई : मुंबईत दीर्घ विश्रांतीनंतर मान्सूनचा पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईसह शेजारील ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. शनिवार आणि रविवारदरम्यान वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ओदिशा किनारपट्टीवर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा येत्या काही दिवसांत तीव्र होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली हळूहळू पश्चिमेकडे सरकेल, ज्यामुळे शनिवार रात्रीपासून मुंबईत पावसाचा जोर वाढेल. या काळात शहरात २०० ते ३०० मिमी पावसाची नोंद होऊ शकते.
ऑगस्ट महिन्यापासूनच मुंबईत पावसाने दांडी मारली आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या ४४ टक्के कमी पाऊस नोंदवला गेला होता. तर सप्टेंबर महिन्यात ११ सप्टेंबरपर्यंत सरासरी ३८४ मिमी पावसाच्या तुलनेत केवळ ३४ मिमी पाऊस झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शनिवारपासून सोमवार सकाळपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर राहील, त्यानंतर पावसाची तीव्रता हळूहळू कमी होईल.
हवामान तज्ज्ञांच्या मते, नजीकच्या काळात होणारा हा पाऊस नैऋत्य मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होण्यापूर्वीचा ‘शेवटचा मोठा टप्पा’ असण्याची शक्यता आहे.