

मुंबईत बुधवारी (दि. १) सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसा सह सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील विविध भागांत पाणी साचणे, झाडे उन्मळून पडणे तसेच इमारतीचा भाग कोसळण्याच्या घटना घडल्या. मरीन ड्राइव्ह आणि अंधेरी येथे झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या असून, सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाळकेश्वर येथे इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळून एका ५१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.
मरीन ड्राइव्हवर झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत
मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मरीन ड्राइव्ह परिसरात आज एक मोठे झाड उन्मळून पडले. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत झाड हटवून वाहतूक सुरळीत केली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अंधेरीत बसचं नुकसान
दरम्यान, अंधेरी पश्चिम येथील डी. एन. नगर मेट्रो स्थानकाजवळही एक मोठे झाड उन्मळून बसवर आणि रस्त्यालगत उभ्या असलेल्या वस्तूंवर कोसळले. या घटनेत बसचे नुकसान झाले असले तरी कोणालाही दुखापत झाल्याची नोंद नाही.
मुंबईच्या अनेक भागांत संततधार, सखल भाग जलमय
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर वाढला असून, बुधवारी पहाटेपासून शहराच्या बहुतांश भागांत संततधार सुरू होती. परळ, दादर, शीव, भायखळा, कुलाबा, मरीन लाइन्स या दक्षिण मुंबईतील भागांसह अंधेरी, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) आणि मुलुंड परिसरातही मध्यम ते जोरदार पाऊस झाला. सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागला.
वाळकेश्वरमध्ये दुर्घटना
याच दरम्यान, मंगळवारी (दि. ३०) रात्री दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर परिसरात बाबुलनाथ रोडवरील 'सूर्यप्रकाश' इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीचा काही भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत संतोष रामचंद्र भारसकर (वय ५१) गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस, बेस्ट, महानगरपालिका अधिकारी आणि १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. बचावकार्य तातडीने हाती घेण्यात आले.
मुंबईला ऑरेंज अलर्ट; प्रशासनाचं सतर्कतेचं आवाहन
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मुंबई आणि कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, पुढील काही तासांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे तसेच जीर्ण इमारती, झाडे आणि पाणी साचलेल्या भागांपासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.