Mumbai : मुसळधार पावसाचा फटका! दादरच्या फुलबाजारात झाड कोसळलं, चर्चगेट-पेडर रोडवरही नुकसान, Video

मुंबईतील मुसळधार पावसामुळे दादरच्या मीनाताई ठाकरे फुलबाजार, चर्चगेट आणि पेडर रोड परिसरात झाडे कोसळली. अनेक स्टॉल आणि वाहनांचे नुकसान झाले असून आयएमडीने मुंबईसह कोकणासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
Mumbai : मुसळधार पावसाचा फटका! दादरच्या फुलबाजारात झाड कोसळलं, चर्चगेट-पेडर रोडवरही नुकसान, Video
Published on

मुंबईत मुसळधार पावसाचा जोर कायम असून शनिवारी शहरातील विविध भागांत झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. दादरमधील मीनाताई ठाकरे फुलबाजारात मोठे झाड कोसळून फुलांच्या स्टॉलचे मोठे नुकसान झाले. तर चर्चगेट आणि पेडर रोड परिसरातही झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने तिन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मीनाताई ठाकरे फुलबाजारात झाड कोसळले

शनिवारी पहाटे दादर येथील मीनाताई ठाकरे फुलबाजारात अचानक मोठे झाड कोसळले. या घटनेत बाजारातील अनेक फुलांचे स्टॉल आणि तेथील साहित्याचे मोठे नुकसान झाले. बाजारात विक्रेते आणि ग्राहकांची गर्दी होण्यापूर्वीच ही घटना घडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे. व्हिडीओमध्ये बाजारातील कर्मचारी फुलांचे खोके उतरवून स्टॉलची तयारी करत असताना काही क्षणांतच मोठे झाड कोसळल्याचे दिसत आहे. झाड पडताच परिसरात एकच धावपळ उडाली. मात्र, या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

चर्चगेट आणि पेडर रोडवरही झाडे उन्मळून पडली

दरम्यान, दक्षिण मुंबईतील चर्चगेट परिसरातील क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) परिसरातही एक मोठे झाड उन्मळून पडले. हे झाड पार्क केलेल्या काळ्या रंगाच्या टाटा नेक्सॉन कारवर कोसळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. तसेच पेडर रोड परिसरातही आणखी एक झाड उन्मळून पडल्याची घटना घडली. या दोन्ही घटनांमध्येही कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

चर्चगेट येथील सीसीआयमध्ये भलेमोठे झाड उन्मळून पडले
चर्चगेट येथील सीसीआयमध्ये भलेमोठे झाड उन्मळून पडले

रेड अलर्टमुळे प्रशासन सतर्क

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात वारंवार झाडे कोसळणे, पाणी साचणे आणि वाहतूक कोंडीच्या घटना घडत आहेत. झाडे हटविण्यासाठी महापालिका आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ४ ते ६ जुलैदरम्यान रेड अलर्ट जारी केला आहे. या काळात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा तसेच जुन्या झाडांपासून, कमकुवत इमारतींपासून आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in