Mumbai Rain: पावसाचा तडाखा कायम! मुंबईत अनेक ठिकाणी झाडे कोसळली; कुर्ल्यात ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

मुंबई आणि नवी मुंबईत मुसळधार पाऊस व जोरदार वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या आणि लोखंडी पत्रे उडण्याच्या घटना घडल्या. कुर्ल्यात झाड कोसळून ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर वांद्रे, कुलाबा, भायखळा, दादर, माहीम आणि घणसोली येथे वाहनांचे नुकसान व वाहतूक विस्कळीत झाली.
Mumbai Rain: पावसाचा तडाखा कायम! मुंबईत अनेक ठिकाणी झाडे कोसळली; कुर्ल्यात ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
Mumbai Rain: पावसाचा तडाखा कायम! मुंबईत अनेक ठिकाणी झाडे कोसळली; कुर्ल्यात ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
Published on

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे रविवारी (दि. ०५) अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या तसेच बांधकामावरील लोखंडी पत्रे उडण्याच्या घटना घडल्या. वांद्रे पूर्व, कुर्ला, घाटकोपर, कुलाबा, भायखळा, दादर, माहीम आणि नवी मुंबईतील घणसोली परिसरात अशा घटनांमुळे वाहतुकीवर परिणाम झाला. कुर्ला येथे झाड कोसळून ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर इतर ठिकाणी वाहनांचे मोठे नुकसान झाले.

वांद्रे पूर्वेत वाहनांवर झाड कोसळले

वांद्रे पूर्व येथे मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे एक मोठे झाड उन्मळून अनेक पार्क केलेल्या वाहनांवर कोसळले. घटनास्थळावरील व्हिडीओमध्ये पांढरी सेडान, लाल एसयूव्हीसह अनेक वाहने झाडाखाली दबलेली दिसत आहेत.

अग्निशमन दल आणि महापालिकेच्या पथकाने तातडीने झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कुर्ल्यात झाड कोसळून ज्येष्ठाचा मृत्यू

कुर्ला पश्चिमेतील नौपाडा परिसरात हिंदी बीएमसी शाळेजवळ दुपारी सुमारे १२.४० वाजता झाड एका दुकानावर कोसळले. या दुर्घटनेत ६३ वर्षीय युनूस कुंदावाला यांचा मृत्यू झाला. त्यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढून फौजिया रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अग्निशमन दल, पोलीस, बेस्ट आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बचावकार्य राबवले.

घणसोलीत बांधकामावरील लोखंडी पत्रे उडाले

दरम्यान नवी मुंबईतील घणसोली परिसरात एका बांधकाम प्रकल्पाभोवती उभारण्यात आलेले लोखंडी पत्रे जोरदार वाऱ्यामुळे थेट रस्त्यालगत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर पडल्याने अनेक वाहनांचे छप्पर, काचा, बोनेट आणि इतर भागांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इतर भागांतही झाडे कोसळली

कुलाब्यात कूपरेज मैदान आणि कॅम्पियन स्कूलजवळ झाड तसेच वाहतूक सिग्नलचा खांब कोसळला. भायखळा पश्चिमेतील बी. जे. मार्गावर झाड पडून सहा ते सात दुचाकींचे नुकसान झाले. दादर पूर्वेतील स्वामीनारायण मंदिर परिसर आणि माहीम येथेही झाडे रस्त्यावर व वाहनांवर कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, हवामान विभागाने मुंबई आणि परिसरासाठी अतिवृष्टीचा इशारा कायम ठेवत नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि झाडे, होर्डिंग्ज तसेच कमकुवत संरचनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in