

मुंबईसह राज्यातील अनेक भागांत बुधवारी (८ जुलै) सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. दरम्यान, मुसळधार पावसाचा फटका पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेलाही बसला आहे. वसई, नालासोपारा आणि विरारदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल गाड्या २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत. तसेच वसई रोड-विरारदरम्यानची उपनगरी सेवा सध्या मर्यादित स्वरूपात सुरू असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
पाणी साचल्याने लोकलचा वेग मंदावला
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, वसई, नालासोपारा आणि विरारदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने या मार्गावरील लोकल गाड्या २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत.
ते म्हणाले, "पाणी साचलेल्या भागातून लोकल गाड्या कमी वेगाने चालवल्या जात आहेत. मात्र, चर्चगेट-विरार आणि विरार-डहाणूदरम्यान रेल्वे सेवा सुरू ठेवण्यासाठी तसेच शक्य तितक्या जास्त गाड्या चालवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत."
वसई रोड-विरारदरम्यान मर्यादित सेवा
पश्चिम रेल्वेने सकाळी ९.३० वाजता सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, वसई रोड ते विरारदरम्यान रुळांवर पाणी साचल्यामुळे उपनगरी लोकल सेवा सध्या मर्यादित स्वरूपात सुरू आहे. मात्र, माहीम-गोरेगाव हार्बर मार्गावरील सेवा नेहमीप्रमाणे सुरू असल्याचेही रेल्वेने स्पष्ट केले.
यापूर्वीही प्रवाशांची रुळांवरून पायपीट
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून वसई आणि नालासोपारा स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे लोकल वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला होता. काही लोकल गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही वसई रेल्वे स्थानकावर अनेक तास हजारो प्रवासी अडकून पडले.
परिस्थिती इतकी गंभीर झाली की, अनेक प्रवाशांनी जीव धोक्यात घालून रेल्वे रुळांवरून पायी चालत वसईहून नालासोपारा आणि विरारपर्यंतचा प्रवास केला. मोबाईलचा टॉर्च सुरू करून अंधारात रुळांवरून चालत घरी जातानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
हवामान विभागाचा इशारा
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मुंबई आणि उपनगरांमध्ये दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्यामुळे पश्चिम रेल्वेने विशेषतः वसई रोड-विरार मार्गावरील प्रवाशांना विलंबाचा अंदाज घेऊनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.