

सध्या डिजिटल पेमेंट आणि सोशल मीडियाच्या युगात ऑनलाइन व्यवहार करणेही काही मुलींकरिता धोकादायक ठरत असल्याची गंभीर बाब मीरा रोड परिसरातून समोर आली आहे. डिजिटल पेमेंटमधून मिळालेल्या माहितीचा गैरवापर करून एका ऑटो-रिक्षा चालकाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या रिक्षा चालकाने GPay वर दिसलेल्या मोबाईल नंबरच्या आधारावर मुलीचा इंस्टाग्राम आयडी शोधून तिला सतत मेसेज करत त्रास दिला. अखेर, स्थानिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.
GPay नंबरवरून पाठलाग
ही घटना gemsofmbmc या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमुळे समोर आली. माहितीप्रमाणे, १७ वर्षीय मुलीने २३ नोव्हेंबर रोजी रात्री रिक्षाने प्रवास करून GPay द्वारे भाडे भरले. पेमेंटचे नोटिफिकेशन मिळताच ऑटोचालकाने तिचा मोबाईल नंबर सेव्ह केला आणि अवघ्या काही मिनिटांत अश्लाघ्य आणि त्रासदायक संदेश पाठवायला सुरुवात केली.
एकटीला भेटण्याचा आग्रह
इथेच थांबण्याऐवजी त्या रिक्षाचालकाने तिचे इंस्टाग्राम खाते शोधून काढले आणि रात्रभर तिला मेसेज करून जवळच्या गार्डनमध्ये “एकटी ये, भेटूया” असा आग्रह धरत राहिला.
या प्रकारामुळे मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दुसऱ्या दिवशी थेट सोसायटीबाहेर हजर
२४ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारास ३ वाजता तो ऑटोचालक थेट मुलीच्या सोसायटीबाहेर येऊन उभा राहिला. मुलीच्या मैत्रिणींनी त्याच्याशी चॅटद्वारे संवाद साधून त्याच्या उद्देशांची खातरजमा केली. चॅटमध्येही तो मुलीला एकटीच भेटण्याचा आग्रह करत असल्याचे स्पष्ट झाले.
रिक्षाचालकाला बेदम मारहाण
जेव्हा हा रिक्षाचालक पुन्हा सोसायटीबाहेर आला, तेव्हा मुलीने स्थानिकांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून त्याला पकडले आणि जोरदार चोप देऊन माफी मागायला लावली. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
डिजिटल पेमेंटही असुरक्षित?
या प्रकरणानंतर डिजिटल पेमेंट ॲप्समधील सुरक्षा आणि गोपनीयतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पेमेंट करताना मोबाईल नंबर आणि नाव दिसणे कितपत सुरक्षित आहे, याबाबत नागरिक चिंता व्यक्त करत आहेत.