मुंबईत पुन्हा हाय अलर्ट! २ शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी, पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर

सोमवारी (दि. १) सांताक्रूझ येथील बिलाबाँग हायस्कूलला ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी आली. धमकीचा ईमेल मिळताच शालेय प्रशासनाने त्वरित मुंबई पोलिसांना याची माहिती दिली.
मुंबईत पुन्हा हाय अलर्ट! २ शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी, पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर
Published on

डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईत धक्कादायक घटना समोर आली. दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाची घटना ताजी असतानाच सांताक्रूझमधील हायस्कूलला बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ईमेल आला. या ईमेलमुळे संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

सोमवारी (दि. १) सांताक्रूझ येथील बिलाबाँग हायस्कूलला ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी आली. धमकीचा ईमेल मिळताच शालेय प्रशासनाने त्वरित मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर, काही मिनिटांतच मुंबई पोलिस, अग्निशमन दल आणि बॉम्ब शोधपथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यावेळी, विद्यार्थी, शिक्षक आणि सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. यानंतर सुरक्षा दलांनी शाळेच्या इमारतीचा आणि परिसरातील प्रत्येक भागाचा शोध घेतला.

‘मिड-डे’ ने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत शाळेत कोणतीही स्फोटक सामग्री सापडलेली नाही, मात्र खबरदारी म्हणून या परिसरात सतत तपासणी सुरू आहे.

सुरेश वाडकरांचा स्टुडिओही रिकामा केला..

सुरक्षेच्या दृष्टीने शाळेलगत असलेले गायक सुरेश वाडकर यांचे आजीवासन स्टुडिओ आणि त्याच संकुलातील एक मंगल कार्यालय रिकामे करण्यात आले. या दोन्ही ठिकाणी नागरिकांची गर्दी असते. म्हणून, सर्वांना बाहेर काढून हा परिसर सील करण्यात आला. या घटनेमुळे सांताक्रूझ परिसरात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

मीरा रोडवरील सिंगापूर इंटरनॅशनल स्कूललाही धमकीचा ईमेल

आज सकाळी ९:३० वाजता मीरा रोडमधील सिंगापूर इंटरनॅशनल स्कूलच्या प्रशासनालाही बॉम्बची धमकी देणारा ईमेल आला होता. याची माहिती शाळेने तातडीने पोलिसांना दिली. माहिती मिळताच, काशिमीरा पोलिस आणि BDDS पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर शाळेची संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

धमकीच्या मेलमुळे आता पोलीस यंत्रणा सज्ज झाली असली तरीही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

logo
marathi.freepressjournal.in