

मुंबई : कांदिवली येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (शताब्दी) रुग्णालयाला ‘नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स’ (एनएबीएच) कडून मानांकन मिळाले आहे. हे मानांकन मिळवणारे हे पालिकेचे पहिले सामान्य रुग्णालय ठरले आहे.
२०२५ मध्ये सुरू झालेल्या तयारीनंतर हे मानांकन मिळाले असून यामुळे रुग्ण सुरक्षा, उपचारांचा दर्जा, संसर्ग नियंत्रण, औषध व्यवस्थापन, वैद्यकीय पद्धती, दस्तऐवजीकरण आणि तक्रार निवारण यांशी संबंधित यंत्रणा अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे. एनएबीएच मानांकनासाठी रुग्णालयांना रुग्ण सुरक्षा, संसर्ग प्रतिबंध, आपत्कालीन सेवा, औषध व्यवस्थापन, वैद्यकीय नोंदी आणि गुणवत्तेत सतत सुधारणा यांसारख्या मानक प्रक्रिया आणि प्रोटोकॉलचे पालन करावे लागते. या मानांकनामुळे अधिक पद्धतशीर आरोग्य सेवा, सुधारित संसर्ग-नियंत्रण पद्धती, उत्तम दस्तऐवजीकरण व संवाद, वैद्यकीय प्रोटोकॉल, रुग्णांच्या हक्कांचे संरक्षण, सेवांमध्ये पारदर्शकता येणे अपेक्षित आहे.
वैद्यकीय उत्कृष्टतेची संस्कृती रुजण्यास मदत
कमी कालावधीत हे मानांकन मिळवणे हा 'बीडीबीए' रुग्णालयासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे आणि हा कर्मचाऱ्यांचे समर्पण व सांघिक कार्याचा परिणाम आहे. डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, पॅरामेडिकल टीम, प्रशासकीय कर्मचारी, तंत्रज्ञ, हाऊसकिपिंग कर्मचारी आणि सर्व सहाय्यक विभागांनी रुग्ण सेवा आणि रुग्णालय यंत्रणेत सुधारणा करण्याच्या सामायिक कटिबद्धतेने एकत्र काम केले. या मानांकनामुळे रुग्णांचा विश्वास अधिक दृढ होईल आणि रुग्णालयात उत्तरदायित्व, सुरक्षा आणि उत्कृष्टतेची संस्कृती रुजण्यास मदत होईल, असे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अजय गुप्ता यांनी सांगितले.
सेवेत अग्रेसर
केईएम, शीव आणि नायर यांसारख्या प्रमुख नागरी रुग्णालयांसाठी एनएबीएच मानांकन मिळवण्याचे पूर्वीचे प्रयत्न यशस्वी झाले नसल्याने पालिकेसाठी हे यश अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. नायर दंत रुग्णालय आणि बीएमसीच्या काही वैद्यकीय महाविद्यालयांना एनएबीएच मानांकन मिळाले आहे; मात्र, सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा पुरवणारे शताब्दी हे मानांकन मिळवणारे पहिले सामान्य रुग्णालय ठरले आहे. रुग्णालय प्रशासनाने केंद्रीय मंत्री आणि स्थानिक खासदार पीयूष गोयल, पालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांचे आभार मानले.