

मुंबईच्या गजबजलेल्या सिग्नलवर रोज भिक्षा मागताना दिसणाऱ्या मुलांच्या आयुष्यात आता बदलाची नवी आशा निर्माण झाली आहे. त्यांच्या हातात भीकऐवजी पुस्तकं देण्याचा एक प्रेरणादायी उपक्रम शहरात सुरू झाला आहे.
चेंबूरमधील अमर महाल उड्डाणपुलाखाली मुंबईतील पहिल्या ‘सिग्नल स्कूल’चे उद्घाटन करण्यात आले. महापौर रितू तावडे यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात झाली. सिग्नलवर राहणाऱ्या आणि भिक्षा मागणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न आहे. केवळ शालेय शिक्षणच नव्हे, तर त्यांना योग्य वर्तन, शिस्त आणि स्वावलंबनाचे धडेही या शाळेत दिले जाणार आहेत.
मुंबईला ‘भिकारीमुक्त’ करण्याचा निर्धार - रितू तावडे
उद्घाटनप्रसंगी बोलताना महापौर रितू तावडे यांनी या उपक्रमामागील व्यापक उद्दिष्ट स्पष्ट केले. "मुंबई भिकारीमुक्त करण्याचा आमचा हेतू आहे. त्यामुळे एकही मूल सिग्नलवर उभं राहून भीक मागणार नाही, तर स्वतःच्या पायावर उभं राहील," असे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या, "यासाठी मुलांना शालेय शिक्षणासोबतच योग्य वर्तनाचे धडे मिळणं गरजेचं आहे. हा उपक्रम त्या दिशेने एक सुंदर प्रयत्न आहे. हे पाहून मला आनंद झाला."
इतर शहरांमध्येही यशस्वी उपक्रम
मुंबईत हा पहिलाच उपक्रम असला, तरी अशाच प्रकारच्या ‘सिग्नल शाळा’ ठाणे आणि नवी मुंबईमध्ये आधीपासून सुरू आहेत. नवी मुंबईत ऑक्टोबर २०२५ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली होती, तर ठाण्यातील तीन हात नाका येथेही हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे. या यशस्वी मॉडेलमुळे आता मुंबईतही अनेक मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.