

मुंबई : मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत दाखल होऊन वर्ष उलटले. मात्र आता कोस्टल रोड प्रकल्पातील भुयारी मार्गावर छत टाकण्याची आठवण सल्लागाराला कशी झाली नाही. पादचाऱ्यांचे नाव सांगून प्रशासनाला वेठीस धरले जाते, असा आरोप स्थायी समिती सदस्य यशोधर फणसे यांनी केला. दरम्यान, आता मंजुरी दिली तर तीन महिन्यांत छत टाकण्याचे काम पूर्ण होईल, त्यामुळे या प्रस्तावाला मंजुरी देण्यात यावी, अशी सूचना अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांनी दिली. अखेर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रस्ताव मंजूर केल्याचे स्पष्ट केले.
मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी २०१८ मध्ये कोस्टल रोड प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर कोस्टल रोड प्रकल्पाला गती मिळाली आणि सहा वर्षांनंतर कोस्टल रोड मार्च २०२४ मध्ये मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला.
दरम्यान, २८ डिसेंबर २०२३ रोजी अतिरिक्त आयुक्तांनी प्रकल्पाची स्थळपाहणी केल्यानंतर पदपथ, सायकल ट्रॅक व प्रोमेनेडच्या सुशोभीकरणामध्ये सातत्य राखण्यासाठी काही सुधारणा सुचविण्यात आल्या. त्यानुसार पादचारी भुयारी मार्गांच्या प्रवेश-निर्गमन भागांवर नवीन छत उभारणे तसेच सुशोभीकरणाची संकल्पना राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
या संदर्भात कंत्राटदार व सल्लागारांमध्ये खर्चाबाबत विविध टप्प्यांवर चर्चा व पुनर्मूल्यांकन करण्यात आले. शेवटी सर्वसाधारण सल्लागारांनी १९.०१ कोटी रुपयांचा खर्च निश्चित केला आहे. याबाबतचा प्रस्ताव दुसऱ्यांदा स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला असता मंजुरी देण्यात आली.