पहिल्याच पावसाने मुंबईची दैना! रेल्वे विस्कळीत; रस्ते वाहतूक कोलमडली, भूमिगत मेट्रो स्थानक जलमय, मंत्रालयात पाणीच पाणी, सरकारी यंत्रणा ठरल्या कुचकामी

नियोजित वेळेच्या तब्बल १६ दिवस आधी महाराष्ट्रासह मुंबईत वरुणराजाची एंट्री झाल्याने पहिल्याच पावसात मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली. वरुणराजाने राज्यातील बहुतांश भागांना झोडपून काढले. मुंबईत रविवारी रात्रीपासूनच सुरू झालेल्या पावसाने संततधार कायम ठेवत मुंबईची दाणादाण उडवली, तर पहिल्याच पावसात मुंबईची दैना झाली आहे.
(छायाचित्र सौजन्य PTI)
(छायाचित्र सौजन्य PTI)
Published on

मुंबई/ठाणे/नाशिक/पालघर/रायगड :

नियोजित वेळेच्या तब्बल १६ दिवस आधी महाराष्ट्रासह मुंबईत वरुणराजाची एंट्री झाल्याने पहिल्याच पावसात मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली. वरुणराजाने राज्यातील बहुतांश भागांना झोडपून काढले. मुंबईत रविवारी रात्रीपासूनच सुरू झालेल्या पावसाने संततधार कायम ठेवत मुंबईची दाणादाण उडवली, तर पहिल्याच पावसात मुंबईची दैना झाली आहे. रस्तेवाहतुकीचा बोजवारा उडाला, तर मध्य रेल्वेला फटका बसला आणि हार्बर रेल्वे सेवा सीएसएमटी ते वडाळापर्यंत दुपारपर्यंत ठप्प होती. राज्यात पहिल्याच पावसाने दोन बळी घेतले असून मुंबईत मे महिन्यात १०० वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. इतिहासात मंत्रालयात प्रथमच पाणीच पाणी झाले, तर काही दिवसांपूर्वीच उद्घाटन करण्यात आलेले वरळीतील आचार्य अत्रे चौक हे भूमिगत मेट्रो स्थानक जलमय झाले होते.

रविवारी रात्रीपासून बरसणाऱ्या पावसाचा जोर सोमवारी सायंकाळपर्यंत कायम होता. जोरदार वाऱ्यासह बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईसह राज्यातील जनजीवन विस्कळित झाले. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, अमरावती, बारामती तालुक्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. अनेक ठिकाणी झाडे कोसळली, नद्यांना पूर आल्याने जनावरे वाहून गेल्याच्या घटना घडल्या. राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयात इतिहासात प्रथमच गुडघाभर पाणी तुंबल्याने एकच तारांबळ उडाली. मंत्रालयात पाणी शिरल्याने महायुतीच्या कारभारावर ताशेरे ओढले. हिंदमाता, मिलन सबवे, दादर टिटी, सायन सर्कल, परळ आदी सखल भाग पाण्याखाली गेल्याने चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले.

मुंबईत गेल्या ७५ वर्षांत मे महिन्यात इतक्या लवकर मान्सूनचे आगमन होण्याची ही पहिलीच वेळ ठरली, असे भारतीय हवामान विभागाच्या मुंबईतील संचालिका शुभांगी भुते यांनी सांगितले. रविवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत मुंबईत १८ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. ३२ ठिकाणी झाडे कोसळली तर पाच ठिकाणी भिंत कोसळल्याची घटना घडली. सोमवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कुलाबा येथे १४४.३ मिमि तर सांताक्रूझ येथे ७४.३ मिमि पावसाची नोंद झाली.

मुंबईसह राज्यभरात मान्सूनने धमाकेदार एन्ट्री केली आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसात मुंबईकरांची दैना केली असून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईमध्ये अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेक भागांमध्ये नालेसफाई, रस्त्यांची कामे रखडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात वीज पडून एकाचा मृत्यू झाला, तर भीमा नदीच्या पात्रात ३ जण बुडाले असून रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. पावसाचा वाढता जोर लक्षात घेता, शासन ‘अलर्ट मोड’वर आले असून राज्यात ठिकठिकाणी एनडीआरएफच्या १८ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला असून गरज असल्यास घराबाहेर पडा, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. दरम्यान, रविवारी रात्रीपासून बरसणाऱ्या पावसामुळे सोमवारी दिवसभर सूर्यदर्शन घडलेच नाही.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, यंदा केरळात २४ मे तर महाराष्ट्रात २५ मे रोजी पावसाचे आगमन झाले. मुंबईतही वेळेआधीच पाऊस दाखल झाला. महाराष्ट्रात दाखल झालेल्या पावसाने रविवार रात्री ते सोमवार दुपारपर्यंत धुमाकूळ घातला. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या उजनी धरणाच्या पाणीपातळीत हळूवार वाढ आहे.

पुणे शहरातही वरुणराजा दोन दिवसांपासून ठाण मांडून आहे. अधूनमधून जोरदार सरी बरसत असून शहरातील अनेक भागात पाणी साचले. गाड्या पाण्याखाली गेल्याने पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेवर टीकेची झोड उठवली. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाजवळील सर्विस रोडला तळ्याचे स्वरूप आले होते आहे. बारामती, इंदापूरमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतीसह अनेकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वसामान्य शेतकरी, नागरिक संकटात साापडला आहे.

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडत असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. नाशिक तालुक्यात शेतकऱ्यांच्या उभ्या कांदा पिकात पाणी साचल्याने संपूर्ण कांदा शेतात सडला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या सिन्नरमध्ये झालेल्या पावसात बाजार समितीमधील खळ्यात पावसाचे पाणी साचल्याने कांदा गोण्यांसह भिजला आहे. तर काही प्रमाणात कांदा अक्षरक्ष: वाहून गेला आहे. शेतीत भाजीपाला आणि बाजार समितीमधील कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजाला आर्थिक फटका बसला आहे.

यंदाच्या मान्सूनने मोडले अनेक विक्रम

मुंबईत मान्सून सहसा ११ जूनला येतो, पण यंदा तो तब्बल १६ दिवस आधीच, म्हणजे २६ मे रोजी दाखल झाला. यंदाच्या मान्सूनने अनेक वर्षांचे विक्रम मोडीत काढले. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, याआधी १९५६, १९६२ आणि १९७१मध्ये २९ मे रोजी मुंबईत मान्सूनचे आगमन झाले होते. त्याचबरोबर यंदाच्या सहस्त्रकाचा विचार करता २००१ ते २०२४ या कालावधीत फक्त २००६मध्ये ३१ मे रोजी मान्सूनची एंट्री झाली होती.

निरा डावा कालवा फुटला, वाहतूक ठप्प

बारामती तालुक्यातील पिंपळी लिमटेक येथे निरा डावा कालवा फुटल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. हजारो लिटर पाणी वाया गेले असून, फुटलेल्या कालव्याचे पाणी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्गावर आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. कालव्यातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात, घरांमध्ये घुसून मोठे नुकसान झाले आहे. काटेवाडी-भवानीनगर हा रस्ताही तूर्तास बंद करण्यात आला आहे.

मान्सूनचा वेग वाढला, अनेक राज्यांमध्ये प्रगती

सध्या मान्सूनची उत्तर सीमा मुंबई, पुणे, सोलापूर, कर्नाटकातील कलबुर्गी, तेलंगणातील मेहबूबनगर आणि आंध्र प्रदेशातील कावलीपर्यंत पोहोचली आहे. पुढील तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्राच्या अधिक भागांत तसेच कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, बंगालचा उपसागर आणि ईशान्य भारतात आणखी वेगाने पुढे सरकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

माहीममध्ये इमारतीचा काही भाग कोसळला

मुंबईच्या माहीममध्ये पितांबर लेन परिसरात असलेल्या हाजी कासम या इमारतीचा काही भाग कोसळला आहे. ही इमारत धोकादायक असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते. सोमवारी या इमारतीच्या छताचा काही भाग आणि इमारतीचा जिना अचानक कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि बीएमसीचे अभियंते तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून दोन कुटुंबांचा संसार मात्र उघड्यावर पडला आहे.

प्रशासनाने अलर्ट राहावे - मुख्यमंत्री

पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्यपूर्णरित्या आढावा घेत आहेत. या परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नुकसान झाले तेथे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिव तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध यंत्रणांना सतर्क आणि सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन, महसूल प्रशासन तसेच गृह विभाग आदींना नियंत्रण कक्षांच्या माध्यमातून तातडीच्या उपाययोजना आणि मदत व बचावासाठीची सज्जता ठेवण्याच्या अनुषंगानेही त्यांनी विविध सूचना केल्या.

प्रशासनाने सतर्कता ठेवून मदतकार्य करावे -एकनाथ शिंदे

प्रशासनाने सतर्कता ठेवून मदतकार्य करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये, तसेच कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळेवर आणि प्रभावी पावले उचलावी, असे निर्देश दिले.

वर्षातील निम्मा पाऊस एका दिवसातच पडला -अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाचा सर्वाधिक फटका बसलेल्या इंदापूर आणि बारामती तालुक्यातील परिस्थितीचा सोमवारी भल्या पहाटेच आढावा घेतला. ते म्हणाले की, “मी पुणे जिल्हाधिकारी आणि इतरांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. दौंड आणि बारामती परिसरात प्रचंड पाऊस झाला आहे. वर्षातील निम्मा पाऊस एका दिवसात पडला आहे. बारामती तालुक्यात पावसाची वार्षिक सरासरी १४ इंच इतकी आहे. त्यापैकी ७ इंच पाऊस रविवारी एका दिवसात पडला.”

पावसाचे दोन बळी

पुण्यातील दौंड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने ताराबाई विश्वचंद्र आहिर (७५) या महिलेचा अंगावर जुन्या बांधकामाची भिंत कोसळल्याने मृत्यू झाला. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुरबाड तालुक्यातील इंदे गावातील एका १६ वर्षीय मुलाचा अंगावर वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. पावसाची संततधार सुरू असताना काही कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या यश रमेश लाटे (१६) या विद्यार्थ्यावर वीज कोसळली अन् त्याचा जागीच मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

मे महिन्यातील सर्वाधिक पाऊस

कुलाबा वेधशाळेने मे महिन्यातील सर्वाधिक पावसाचा विक्रमही मोडला आहे. आतापर्यंत या महिन्यात २९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याआधीचा विक्रम १९१८ मध्ये २७९.४ मिमी इतका होता. २०२१ मध्ये आलेल्या तौक्ते चक्रीवादळादरम्यान पडलेला पाऊसही यापेक्षा कमी (२५७.८ मिमी) होता.

मंत्रालयात पाणीच पाणी!

रविवारी रात्रीपासून बरसणाऱ्या पावसाचा जोर सोमवारी कायम होता. मुंबईसह राज्याला पहिल्याच पावसाने झोडपले. मुंबईत अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले, तर झाडे कोसळली. मात्र राज्याचा कारभार चालवणाऱ्या मंत्रालयात यंदा पाणी शिरले. मंत्रालयात पाणी शिरल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. त्यामुळे इतिहासात प्रथमच मंत्रालयात पाणीच पाणी अशी स्थिती निर्माण झाली.

वरळी भुयारी मेट्रोत घुसले पाणी

मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या भुयारी मेट्रोच्या कामाची पहिल्याच पावसाने पोलखोल झाली. ॲॅक्वा मार्ग-३ ला पावसाचा फटका बसला असून आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकाच्या आत पावसाचे पाणी शिरले. भुयारी मेट्रो मार्गाच्या पायऱ्यांवरूनही पाणी वाहू लागल्याने हे मेट्रो स्थानक आहे की धबधबा, असा प्रश्न निर्माण झाला. मेट्रोमधून उतरताच प्रवाशांना तळ्यात उतरल्याचा भास झाला. दरम्यान, पाणी साचल्यानंतर मेट्रो सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला तर, या भुयारी मेट्रोकडे जाणारा मार्गही बंद करण्यात आला.

मुंबई, ठाणे, रायगडला ‘रेड अलर्ट’

हवामान विभागाने राज्याच्या विविध भागांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुण्याच्या व साताऱ्याच्या घाट परिसरात मंगळवारी विजा आणि मेघगर्जनेसह अतिजोरदार पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पुणे शहर वगळता पुणे जिल्हा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बीड, लातूर व धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. पुणे शहरासाठी पुढील चार दिवस ‘यलो अलर्ट’ असेल. रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांनाही अतिजोरदार पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील ५ दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पावसाचा जोर कायम राहील.

केईएम रुग्णालयालाही फटका

मुसळधार पावसाचा फटका पालिकेच्या केईएम रुग्णालयालाही बसला. पावसाचे पाणी आत घुसल्याने केईएम रुग्णालयातील सेवा ठप्प झाली. तळमजल्यावर असलेल्या बालरोग अतिदक्षता विभागातील कामकाज बंद पडले. प्रशासनाने तत्काळ पावले उचलत ही सेवा पूर्ववत केली.

  • मुंबईत मे महिन्यात १०० वर्षांतील सर्वाधिक पाऊस, १९१८ नंतर पहिल्यांदाच इतका पाऊस

  • पावसाचे दोन बळी; दौंडमध्ये वृद्ध महिलेचा अंगावर भिंत पडून, तर मुरबाडमध्ये १६ वर्षांच्या मुलाचा वीज पडून मृत्यू

  • भीमा नदीपात्रात ३ जण बुडाले, बचावकार्य सुरू

  • राज्यात एनडीआरएफच्या

  • १८ टीम तैनात

  • पुढील चार दिवस अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज

logo
marathi.freepressjournal.in