Mumbai : 'लोकलमधील ३ डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा'; Gen Z, Gen Alpha साठी तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

चर्चगेट-डहाणू आणि सीएसएमटी-डोंबिवली/आसनगाव या मार्गांवर अशी व्यवस्था करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आहे.
Mumbai : 'लोकलमधील ३ डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा'; Gen Z, Gen Alpha साठी तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
'एआय' ने संपादित केलेली प्रतिमा
Published on

मुंबई : मुंबई लोकलमधील गर्दीच्या प्रवासातून विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा, यासाठी भाजपच्या नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी केली आहे. Gen Z आणि Gen Alpha पिढीतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लोकलमधील तीन डबे राखीव ठेवावेत, तसेच सकाळी ५ ते ११ या गर्दीच्या वेळेत ही सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गांवर ही व्यवस्था करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर स्वतंत्र डब्यांची मागणी

घोसाळकर यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दोन्ही मार्गांवरील लोकल सेवांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र डबे उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. विशेषतः चर्चगेट-डहाणू आणि सीएसएमटी-डोंबिवली/आसनगाव या मार्गांवर अशी व्यवस्था करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आहे.

Mumbai : 'लोकलमधील ३ डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा'; Gen Z, Gen Alpha साठी तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
Mumbai : 'लोकल खाेळंब्या'ने हालच हाल! सोमवार ठरला 'त्रासवार',पश्चिमसह मध्य रेल्वेवरही तांत्रिक बिघाड

मुंबईतील विविध महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी लोकलने प्रवास करतात. गर्दीच्या वेळेत त्यांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र डबे उपलब्ध झाल्यास त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होऊ शकतो, असे घोसाळकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

सध्या महिलांसाठी दोन डबे राखीव

घोसाळकर यांनी म्हटले की, मुंबई लोकलमध्ये सध्या महिलांसाठी दोन डबे राखीव आहेत. याशिवाय प्रथम श्रेणीचा आणि सामानासाठी स्वतंत्र डबाही असतो. मात्र, गर्दीच्या वेळेत उर्वरित डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या गर्दीचा सामना करावा लागतो.

तीन डबे राखीव केल्यास गर्दीचा ताण वाढणार?

विद्यार्थ्यांसाठी आणखी तीन डबे राखीव ठेवण्याच्या प्रस्तावामुळे इतर प्रवाशांसाठी उपलब्ध जागा कमी होऊन उर्वरित डब्यांवरील गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेत गर्दीच्या वेळेत आधीच मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे या प्रस्तावाची अंमलबजावणी करताना इतर प्रवाशांवरील संभाव्य परिणामांचाही विचार करावा लागणार आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयाकडे लक्ष

जेन-झी आणि जेन-अल्फा पिढीतील तरुणांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्यासाठी सुविधा निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून ही मागणी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मुंबईच्या उपनगरीय रेल्वेच्या प्रत्यक्ष कामकाजात विद्यार्थ्यांसाठी तीन स्वतंत्र डबे राखीव ठेवणे शक्य आहे का, याबाबतचा निर्णय रेल्वे मंत्रालयाला घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आता रेल्वे मंत्रालय या प्रस्तावावर काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

Mumbai : 'लोकलमधील ३ डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा'; Gen Z, Gen Alpha साठी तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
Mumbai : लोकलमध्ये दिव्यांग प्रवाशांवर हल्ले; एकाच दिवशी दोन घटनांमध्ये केली मारहाण

घोसाळकर भाजपमध्ये दाखल

तेजस्वी घोसाळकर या मुंबई महापालिकेतील प्रभाग क्रमांक २च्या भाजपच्या नगरसेविका आहेत. महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपने त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी मोठ्या मताधिक्याने निवडणूक जिंकली.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in