मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

मुंबई-ठाण्यासह राज्यातील २९ महापालिकांच्या प्रलंबित निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल असून आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू
मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू
Published on

मुंबईतील बहुप्रतिक्षित बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकांच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी (१५ डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. त्यानुसार १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान, तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी शेवटची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये झाली होती. आता पुणे, नागपूर, ठाणे, नाशिकसह राज्यातील एकूण २९ महापालिकांच्या निवडणुकांचाही कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

निवडणूकांचे वेळापत्रक

• नामनिर्देशन अर्ज दाखल : २३ ते ३० डिसेंबर

• अर्ज छाननी : ३१ डिसेंबर

• उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख : २ जानेवारी २०२६

• चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी : ३ जानेवारी

• मतदान : १५ जानेवारी

• मतमोजणी आणि निकाल : १६ जानेवारी

मतदान केंद्रांची उभारणी

या निवडणुकांसाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली. राज्यातील या २९ महापालिकांसाठी ३ कोटी ४८ लाख मतदार निवडणुकासांठी मतदान करणार आहेत. त्यासाठी एकूण ३९,१४७ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यामध्ये एकट्या मुंबईसाठी १०,१११ मतदान केंद्रांचा समावेश आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणुकांचा मार्ग मोकळा

ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यामुळे गेल्या ५ ते ७ वर्षांपासून राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर २ डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. आता पुढील टप्प्यात महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

२०१७ च्या BMC निवडणुकीत कोण जिंकले होते?

२०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अविभाजित शिवसेनेने ८४ जागा तर भाजपने ८२ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी शिवसेना आणि भाजप युतीत होते.काँग्रेसला ३१, राष्ट्रवादी काँग्रेसला १३, तर मनसेला ७ जागा मिळाल्या होत्या.

logo
marathi.freepressjournal.in