आज-उद्या रेड अलर्ट; मुंबई, ठाणे, पालघर, रायगडात मुसळधार पावसाचा इशारा

जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने झोडपून काढल्याने मुंबईकरांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असतानाच भारतीय हवामान विभागाने मुंबई व लगतच्या ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांसाठी शनिवार आणि रविवारी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.
आज-उद्या रेड अलर्ट; मुंबई, ठाणे, पालघर, रायगडात मुसळधार पावसाचा इशारा
आज-उद्या रेड अलर्ट; मुंबई, ठाणे, पालघर, रायगडात मुसळधार पावसाचा इशाराछायाचित्र : विजय गोहिल
Published on

मुंबई : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने झोडपून काढल्याने मुंबईकरांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असतानाच भारतीय हवामान विभागाने मुंबई व लगतच्या ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांसाठी शनिवार आणि रविवारी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, अशी सूचना नागरिकांना करण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबईत गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत मुसळधार पाऊस पडला असून अंधेरी सब वे, विरा देसाई रोड, घाटकोपर, मालाड दादर, मुलुंड, भांडुप या भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने हजेरी लावत शहराला अक्षरशः झोडपून काढले.

हवामान विभागाच्या वर्गीकरणानुसार, २४ तासांत ६४.५ ते ११५.५ मिमी पाऊस झाल्यास तो मुसळधार, ११५.६ ते २०४.४ मिमी पाऊस झाल्यास अतिमुसळधार आणि २०४.५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्यास अति ते अतिमुसळधार पाऊस पडला. या निकषानुसार राम मंदिर आणि वांद्रे येथे अतिमुसळधार, तर इतर बहुतांश भागांत मुसळधार पावसाची नोंद झाली.

सखल भागात पाणी साचल्याने  रेल्वे, रस्ते वाहतूक मंदावली होती. त्यामुळे शुक्रवारीही प्रवाशांना प्रचंड गर्दीतून प्रवास करावा लागला. प्रतीक्षा नगर, किंग्ज सर्कल, अंधेरी येथील रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे हाल झाले. दादर, परळ, सायन, चुनाभट्टी, चेंबूर, भायखळा, कुर्ला, वांद्रे, वडाळा, मानखुर्द आदी सखल भागात पाणी साचले होते. पालिकेने पंपाच्या सहाय्याने पाण्याचा निचरा केला. दरम्यान शनिवारी, रविवारीही पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबई आणि परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

गुरुवार सकाळ ते शुक्रवार सकाळपर्यंत शहरात १२१ झाडे पडल्याच्या, १० घर/भिंत कोसळल्याच्या आणि २९ शॉर्ट सर्किटच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जोगेश्वरी येथील एका चाळीत शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या घटनेत दोन ज्येष्ठ नागरिक जखमी झाले आहेत.

चिपळूणमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. दुपारनंतर चिपळूणमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. खेडमध्ये जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. चिपळूणसह खेड, गुहागर, दापोली भागात जोरदार पाऊस सुरु आहे.

नाशिकमध्ये दमदार

नाशिक जिल्ह्यातही    दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. महिनाभराच्या विश्रांतीनंतर नाशिकच्या कळवण पश्चिम पट्ट्यात पावसाने आज जोरदार बँटिंग करत सुरुवात केली. आज झालेल्या दमदार पाऊसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तर अनेक घराच्या पायरीपर्यंत पावसाचे पाणी शिरले आहे. पावसामुळे कच्च्या घरच्या भिंती पडण्याची दाट शक्यत निर्माण झाली आहे. दरम्यान, पावसाच्या आगमनाने बळीराजा आनंदला असून पश्चिम पट्ट्यात भात लागवडीसह  खरीप पिकांच्या पेरणीला वेग येणार आहे.

कुठे किती पाऊस

शुक्रवार सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत शहरातील अनेक भागांत १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. सर्वाधिक १३८.५ मिमी पाऊस राम मंदिर परिसरात झाला. कुलाबा वेधशाळेत १११.८ मिमी, तर सांताक्रूझ वेधशाळेत १०१ मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय वांद्रे येथे ११७.५ मिमी, भायखळा ११३.५ मिमी, चेंबूर (टाटा पॉवर) १०९.५ मिमी, सायन १०९.५ मिमी, जुहू विमानतळ १०६ मिमी आणि विक्रोळी येथे ९८ मिमी पाऊस झाला.

छायाचित्र : विजय गोहिल

डोंगराचा भाग कोसळला

कुर्ला येथील वॉर्ड क्र. १६४ मधील नेताजी नगर परिसरात हनुमान मंदिराजवळ शुक्रवारी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास डोंगराचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले.

राज्यभरात अतिवृष्टीचा अंदाज

पुढील चार दिवसांत, कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. या काळात ताशी ४० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पूरस्थिती उद्भवण्याचा इशाराही देण्यात आला आहे. नाशिकमध्ये मध्यम ते जोरदार आणि नागपूरमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in