

मुंबई : जून महिना संपत आला तरी पाऊस बरसेल अशी आशा आता धूसर झाली आहे. मात्र, मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांसाठी पुढील चार दिवस 'एलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. त्यात २ जुलै रोजी मुसळधार पाऊस बरसेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दुसरीकडे, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणक्षेत्रात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे सातही धरणांतील पाणीसाठा खालावला असून तो ७ टक्क्यांपेक्षा कमी उपलब्ध आहे. या परिस्थितीमुळे धरणांतील पाणीसाठ्याने मुंबईची चिंता वाढवली आहे.
मुंबईसह राज्यातील जनता पावसाकडे चातकासारखी डोळे लावून बसली आहे. जून महिन्यात सरासरी ४०० मिमी पावसाची नोंद होते. मात्र, यंदा जून महिन्यात वरुणराजाची कृपादृष्टी झालेली नाही. अल् नीनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस लांबणीवर पडला आहे. जून महिना कोरडा गेला असला तरी जुलै महिन्यात पावसाची दमदार बॅटिंग होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पाणी कपातीत जुलैच्या पहिल्या आठवड्यात वाढ
मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी व तानसा या सात धरणांतून मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. वर्षभराची तहान भागवण्यासाठी धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज भासते. सध्या सातही धरणांत २८ जून रोजी १ लाख २ हजार ४६० दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. १५ मे पासून १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. मात्र, एल नीनोचा प्रभाव असल्याने यंदा पाऊस किती व कधी पडेल याचा अंदाज नाही. त्यामुळे भविष्यातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन म्हणून पाणी कपातीत १ जुलैच्या पहिल्या आठवड्यात आणखी १० टक्के, अशी एकूण २० टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मान्सूनने देशातील २२ राज्यांना व्यापले आहे. उर्वरित राज्यांना ५ जुलैपर्यंत व्यापू शकतो.
२८ जून रोजी पाणीसाठा (टक्केवारीत)
अप्पर वैतरणा: ०
मोडक सागर: १८.५०
तानसा: ०.४१
मध्य वैतरणा: ११.३६
भातसा: ५.८५
विहार: ४४.८३
तुळशी: २१.१२