मुंबईत खाजगी वाहनांचे वर्चस्व; सार्वजनिक वाहतुकीचा वाटा नगण्य

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'पर्यावरण स्थिती अहवाल २०२४-२५' नुसार, मुंबईतील वाहनांची संख्या तब्बल ५० लाखांच्या पुढे गेली आहे. मात्र, यामध्ये सार्वजनिक वाहतुकीचा वाटा अत्यंत कमी असून खाजगी वाहनांचेच वर्चस्व कायम आहे.
मुंबईत खाजगी वाहनांचे वर्चस्व; सार्वजनिक वाहतुकीचा वाटा नगण्य
Published on

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'पर्यावरण स्थिती अहवाल २०२४-२५' नुसार, मुंबईतील वाहनांची संख्या तब्बल ५० लाखांच्या पुढे गेली आहे. मात्र, यामध्ये सार्वजनिक वाहतुकीचा वाटा अत्यंत कमी असून खाजगी वाहनांचेच वर्चस्व कायम आहे.

अहवालानुसार, मार्च २०२५ पर्यंत मुंबईत एकूण ५०,५४,९०७ वाहने नोंदणीकृत झाली. यापैकी जवळपास ८८ टक्के वाहने दुचाकी (५९.३४%) आणि कार/जीप (२८.७२%) आहेत. तर सार्वजनिक वाहतुकीतील बसेसचा वाटा केवळ ०.७३ टक्के इतकाच आहे.

इतर वाहनांमध्ये ऑटोरिक्षा ५.०२ टक्के, टॅक्सी ३.२७ टक्के, मालवाहू वाहने ०.४२ टक्के, ट्रॅक्टर/ट्रेलर ०.०२ टक्के आणि इतर वाहने २.७२ टक्के इतकी आहेत.

वर्षभरात नवीन वाहनांच्या नोंदणीत वाढ

एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत मुंबईत किमान २.९४ लाख नवीन वाहनांची नोंदणी झाली. ही नोंदणी मागील वर्षाच्या तुलनेत ६.२ टक्क्यांनी जास्त आहे. नव्या वाहनांमध्येही ६०.८७ टक्के दुचाकी आणि जवळपास २४ टक्के कार/जीप आहेत.

इंधन वापराचे चित्र

मुंबईत सध्या सर्वाधिक ७८.७९ टक्के म्हणजे ३९.८३ लाख वाहने पेट्रोलवर, तर ११.१५ टक्के (५.६३ लाख) डिझेलवर चालतात. सीएनजी वाहनांची संख्या ४.३६ लाख आहे. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या अजूनही अत्यल्प असून ती फक्त ४८,८५४ इतकी आहे.

बेस्टचा पर्यावरणपूरक ताफा

मार्च २०२५ अखेर बेस्टकडे २,७३१ बसेस होत्या. यापैकी ६१२ बेस्टच्या मालकीच्या, तर २,११९ वेट-लीजवर चालवल्या जातात. महत्त्वाचे म्हणजे, ९१ टक्के बसेस सीएनजी आणि इलेक्ट्रिक आहेत.

अहवालात म्हटले आहे की, २०२७ पर्यंत बेस्टचा संपूर्ण ताफा इलेक्ट्रिक बसेसचा असेल. त्यामुळे दरवर्षी तब्बल ३.१८ लाख टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी होईल अशी अपेक्षा आहे.

logo
marathi.freepressjournal.in